सकाळ
२१ सप्टेंबर २००६

...अन्‌ लखनौच्या रस्त्यांवर अवतरली अशीही "गांधीगिरी'!

शरद प्रधान - सकाळ न्यूज नेटवर्क
लखनौ, ता. २० - शुभ्र गांधी टोपी परिधान केलेले तीस-पस्तीस नागरिक मद्य विक्रेत्यांना हसतमुखाने फुले देताहेत आणि त्यांचा व्यवसाय दूर हलविण्याची हात जोडून विनंती करताहेत... हे चित्र कोणाला स्वातंत्र्यपूर्व काळातील वाटेल, तर कोणाला सत्याग्रहावर आधारित एखाद्या चित्रपटातील वाटेल; पण लखनौत आज हे दृश्‍य प्रत्यक्ष पाहायला मिळत होते. "मुन्नाभाई'च्या "लगे रहो'चा प्रभाव पडलेल्या काही जणांमुळे येथील रस्त्यांवरही चक्क "गांधीगिरी' अवतरली होती! ........
राणाप्रताप मार्गावरील शिवमंदिर आणि मशिदीपासून केवळ पंधरा मीटरवर असलेले मद्य विक्रीचे दुकान दूर हलवावे, यासाठी लखनौच्या त्या भागातील काही नागरिकांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, या संदर्भातील आणखी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरू असल्याने खंडपीठाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे मद्यविक्री दुकानाला असलेला विरोध व्यक्त करण्यासाठी या नागरिकांनी आज वेगळीच शक्कल लढविली.

या तीस-पस्तीस जणांनी शुभ्र गांधी टोपी परिधान करून शहरातील रस्त्यांवरून शिस्तबद्ध फेरी काढली. वाटेतील मद्य विक्रीच्या दुकानांत जाऊन ते मालकांना फुले देत होते आणि मद्य विक्री दुकाने दूर नेण्याची मागणी असलेले निवेदन देऊन त्यांना त्यावर विचार करण्याची हात जोडून विनंतीही करीत होते. ही पदयात्रा न्यायालयाच्या आवारातही गेली आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व वकिलांनाही त्यांनी फुले आणि निवेदन दिले. विशेष म्हणजे मद्यविक्री परवाने देण्याचा प्रभार असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी फुले देऊन निवेदनाकडे लक्ष देण्याची विनंती केली.

वादग्रस्त मद्यविक्री दुकानाचे चालक गुरनामसिंग मात्र या अनोख्या "गांधीगिरी'मुळे अस्वस्थ झाले आणि त्यांनी पोलिसांना बोलावून या "सत्याग्रहीं'चा "बंदोबस्त' करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्यावर कारवाई करण्यासारखा गुन्हाच घडला नसल्याने पोलिसही हतबल ठरले आणि केवळ तंबी देऊन त्यांनी या सगळ्यांना सोडून दिले.

लोकांच्या इच्छेविरुद्ध मद्यविक्रीचा परवाना देणाऱ्या आणि प्रत्यक्ष विक्री करणाऱ्यांपर्यंत आमचा संदेश जावा, हा या मागचा उद्देश असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. "लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटातून आपल्याला "गांधी मार्गा'वर येण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले असून, संजय दत्तमुळेच आपल्याला अशा अनोख्या "गांधीवादा'चे धडे मिळाल्याचे मान्य करून त्याचे ऋणही व्यक्त करण्यात आले आहेत! मद्य विक्रीचे दुकान इतरत्र हलविण्याची मागणी करीत या नागरिकांनी केलेल्या "सविनय सत्याग्रहा'ने समाज व्यवस्थेच्या मर्मावर बोट नक्कीच ठेवले आहे; पण त्यासाठी त्या "महात्म्या'पेक्षा "मुन्नाभाई'च्या "गांधीगिरी'चा आधार घेतला जावा, याला काळाचा महिमा म्हणावा की दैवदुर्विलास?