गोळे साहेब,

आपण वैद्यबुवांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे.  हा प्रश्न मोठा तत्त्वज्ञानातला आहे असे माझे मत आहे.

लहानपणापासून माझ्या थोरल्या बंधूंच्या मार्गदर्शनाखाली माझ्या आचार-विचारांना दिशा आणि वळण मिळाले.  एक महत्त्वाचे वळण म्हणजे प्रत्येकाने कोठलेही व्यसन लागू नये याची खात्री करावी असे होते.  अगदी लहान वयात ही शिकवणूक अंगवळणी पडली.  सुरुवात झाली ती चहा न पिण्यापासून.  माझे वडील दिवसातून दोन कप चहा प्यायचे.  एक सकाळी उठल्यावर आणि दुसरा कप दुपारी ३-४ वाजता.  ५ नंतर चहा प्यायला तर त्यांना झोप लागत नसे त्यामुळे आणखी पिण्याचा प्रसंगच यायचा नाही.

अशी घरात फक्त माफक चहाची पद्धत असूनहि माझ्या भावाने आम्हा सर्व भावंडांसाठी चहा घेणे वर्ज्य केले.  कुठलीहि क्रिया (चहा, लिंबूसरबत, सिगारेट वगैरे पिणे, ) ही आपल्या ताब्यात असली पाहिजे.  आपण त्या क्रियेच्या आधीन असता कामा नये हा मुख्य उद्देश त्यात होता.  असे वळण लहानपणापासून असल्यामुळे आम्ही चहापासून इतर सर्व व्यसनापासून मनापासून दूर राहिलो.

व्यसन म्हणजे जी गोष्ट घडली नाही तर तुम्हाला दुसरे काही सुचत नाही आणि तुमचे काम बंद पडते अशी सवय. तसेच नंतर ती गोष्ट घडली तरच मग तुम्ही आपले नित्यक्रम पुन्हा चालू करू शकता. 

चहा/कॉफी पिणे, तंबाखू सेवन करणे (फुंकणे, खाणे किंवा नाकात कोंबणे, वा त्याची पट्टी लावून घेणे), मद्यपान, इतर मादक पदार्थांचे सेवन इत्यादि यसनाचे सहज दिसणारे प्रकार आहेतच.  पण अभ्यास सोडून रेडियोवरील गाणी ऐकणे, सिनेमा बघायला जाणे ही सुद्धा व्यसनेच आहेत.  थोडक्यात आपल्या जीवनावर ताबा ठेवणारी सवय म्हणजे व्यसन होय.

कलोअ,
सुभाष