सकाळ
२३ सप्टेंबर २००६
रस्त्यात अडथळा ठरणारी भिंत हटविण्यासाठी "गांधीगिरी'ने मोर्चा
पुणे, ता. २२ - भर रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या भिंतीबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी आज एक विशेष मोर्चा "गांधीगिरी'च्या पद्धतीने काढण्यात आला होता. विद्यार्थी, स्थानिक नागरिक, दुकानदार यांचा हा एकत्रित मोर्चा होता. त्यात सुमारे १०० जण सहभागी झाले होते. ........
शांततेच्या मार्गाने कोणतीही घोषणाबाजी न करता काढण्यात आलेल्या या मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत होते ते गुलाबाचे फूल देऊन. मोर्च्यात सहभागी झालेल्यांच्या हातात गांधीजींची छायाचित्रेही होती.
धनकवडीतील "पीआयसीटी' महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीचा सुमारे ६० मीटर भाग धनकवडीमधील महालक्ष्मी मंदिर ते हॉटेल पार्क या रस्त्यावर आला असून, हा भाग रहदारीला अडथळा ठरत असल्याचे विद्यार्थी व नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांना वारंवार वाहतुकीच्या कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही भिंत हटविण्याबाबत वंदे मातरम संघटना व वंदे मातरम विद्यार्थी संघटना यांनी या मोर्चाचे आयोजन केले. स्थानिक नागरिकांना या मोर्चाची माहिती देत त्यांनाही मोर्च्यात सहभागी करून घेण्यात आले.
त्यानंतर "पीआयसीटीच्या' प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. "पीआयसीटी'च्या व्यवस्थापनाने याची दखल घेतली असून, उद्या चर्चेला बोलविण्यात आले आहे, अशी माहिती वैभव वाघ व योगेश कुलकर्णी या कार्यकर्त्यांनी दिली.