माझ्या असे लक्षात आलंय की मुंबई व महाराष्ट्रातील घुसखोरी ह्या विषयावर चिडून बोलणारे ह्यांतील बव्हंशी (सगळेच नव्हे)  लोकांनी  भारतातील इतर प्रांतांतला अनुभव मनापासून घेतलेला नसतो. बदली/शिक्षणा निमित्त बाहेर जावे लागले तरी सामान्य मराठी माणूस तिथल्या परिस्थितीशी जुळवून न घेता कशीतरी आपली term संपवून महाराष्ट्रातच नव्हे तर परत आपल्याच गावी जाण्यासाठी आटापिटा करतो. मी बरेच दिवस चंद्रपूरला (बँकेत) होतो. तिथे बँका, रेल्वे, पोस्ट व इतर सर्व सरकारी कार्यालयांत ५०% लोक आंध्र, तमिळ आहेत. कारण ? नागपुराहून (१५० किमी) बदली केलेली मंडळीही नाखुशीने काम करायची व त्यातही जास्तीतजास्त काळ सुटीवर असायची. चंद्रपुरापासून ३० किमी च्या परिसरांत  ACC, L&T, माणिकगढ सिमेंट, बल्लारपूर पेपर, १० ते १२ कोळशाच्या खाणी, आशियातले सर्वात मोठे थर्मल पॉवर प्लाँट इ. सारख्या मोठ्या संस्था असून सर्वत्र ५०% तरी परप्रांतीय आहेत. कारण ? बऱ्याच वेळेस मी ह्या संस्थांमधील वरिष्ठ लोकांशी बोलताना असे आढळायचे की इतर प्रांतांतील लोक जसे इथे येतात तसे महाराष्ट्रातील इतर भागांतील लोक काम मिळत असतानाही स्थलांतरित होण्यास जास्त उत्सुक नसतात.
      त्याआधी मी हैद्राबाद, तेनाली, वारंगल वगैरे ठिकाणी २५ वर्षे काम केले. माझे शालेय शिक्षण देखील हैद्राबादला झाले. तिथे एक लाखाहून जास्त (हा आकडा १९९५ चा आहे) मराठी लोक आहेत. त्यातले बरेच लोक काही पिढ्यांपासून स्थायिक झालेले आहेत, आणि ते आनंदात आहेत, रमले आहेत. पण नवीन जे जातात ते लवकरात लवकर महाराष्ट्रात परत यायला बघतात. माझ्या अनुभवानुसार आंध्रात जास्त सुबत्ता आहे, महाराष्ट्रापेक्षा महागाईही कमी आहे, कारण कर कमी आहेत. 
      तसे पाहतां मुंबई, पुणे हा भाग सोडला तर एवढा मोठा महाराष्ट्र, तिथे असलेल्या सोई व सुविधा व देशांतील इतर प्रांतांतील सोई सुविधा ह्यांत फार मोठा फरक नाही.
       मी जे अनुभवलेले आहे, ते निदर्शनास आणण्याचा प्रयत्न. इतर कारणें वा दुमत असणार हे मला कबूल. वाद नको म्हणून दक्षता.