एक महत्त्वाचा मुद्दा मांडल्याबद्दल विकि ह्यांचे अभिनंदन.
आज महाराष्ट्रावरचे हे एक मुख्य संकट आहे.
ह्याची कारणे बरीच आहेत. पण त्यावर उपाय शोधण्यापेक्षा लोक समर्थन करू लागतात ते जास्त भयानक आहे.
समर्थनाचे मुद्दे म्हणजे, हिंदी ही राष्ट्रभाषा, भारतात कोठेही रहाण्याचा हक्क इ.
हिंदी ही राष्ट्रभाषा असेल पण तिच्या संवर्धनाची जबाबदारी फक्त मराठी माणसाची कशी?
भारतात कोठेही रहाण्याचा हक्क जरूर. पण स्थानिकांना हुसकावून लावून नाही.
तसेच मराठी माणसांनी महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरायचा नाही तर कुठे? मद्रास मध्ये जाऊन का?
मराठी माणसे भारतभर पसरली पण त्यांनी तिथली भाषा, संस्कृती आत्मसात केली. इथे येणाऱ्या लोकांकडून एवढी किमान अपेक्षा नाही का ठेवायची?
बेंगलोर महापालिकेचा कारभार कधीतरी तमिळ किंवा मलयाळम मध्ये होईल का?
आज बेळगाव ही महाराष्ट्रात नाही जिथे मराठी माणसांचे बहुमत आहे आणि मुंबई आणि पुणे पण आपण हरवून बसलो आहोत. उद्या हीच स्थिती नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि इतर शहरांची होणार आहे.
महाराष्ट्र हा काही इतर लोकांना आंदण दिलेला नाही.
कर्नाटक सरकारने प्राथमिक शिक्षण कन्नड मध्ये सक्तीचे केल्याचे वाचले. ते चूक की बरोबर हा भाग वेगळा. पण आपण सर्वांनी किमान दुसरी / तिसरी भाषा म्हणून मराठीचा आग्रह धरला तर काय चुकले?
आज कॅलिफोर्नियामध्ये प्राथमिक शिक्षणात स्पॅनिश ही दुसरी भाषा आहे.
सर्व स्थानिक व्यवहार हे इंग्रजी आणि स्पॅनिश मधून होतात. स्पॅनिश शिकायला कोणीही तक्रार करत नाही. महाराष्ट्रातच का टाळाटाळ?
महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहून, मराठी आत्मसात केलेले परके मुळीच नाहीत.
स्थानिक लोकांच्या भाषेचा इतरांनी किमान आदर ठेवावा हीच अपेक्षा.
इथल्या लोकांवर उपकार म्हणून बाहेरून लोक येत नाहीत. की इथले लोक त्यांना आग्रहाने बोलावतात. ते आपल्या पोटापाण्यासाठी येतात. तेव्हा इथे येवून टिमकी मारणे हे चुकीचे आहे.
मराठीचा आग्रह म्हणजे राष्ट्रदोह होत नाही. की स्वत:ला भारतीय म्हटले की सर्वांशी हिंदीतच बोलले पाहिजे. आम्हीही जन गण मन म्हणतो आणि त्याच झेंड्याला प्रणाम करतो. इथे वेगळ्या राष्ट्राचा मुद्दा हास्यास्पद आहे.
किती हिंदी भाषिक लोक हिंदी शिवाय एखादी भारतीय भाषा शिकतात?
किंवा इतर भारतीय भाषांचा आदर ठेवतात?
मराठीच्या मुद्द्यावरून एक व्यापक जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे.