तसा  मी मनोगतावर नवीनच आहे (सक्रिय सदस्य म्हणून). त्यामुळे माझी ही खालील वैयक्तिक मते अगदीच प्राथमिक स्वरूपाची असू शकतील.

मला असं वाटतं कि, या चर्चेला दोन मुद्दे आहेत.

१) मनोगताच्या माध्यमातून मराठी लोकांना , मराठीतून एकमेकांशी संवाद साधण्याची एक चांगली सोय झाली आणि त्याची आता आपल्याला सवय झाली. आता त्या सवयीचा आधार घेउन, पुढची पायरी म्हणजे आपण एकमेकांच्या आधारे मराठी भाषेची  तांत्रिक शब्दांची जी एक थोडीशी लंगडी बाजू आहे, ती आपापल्या कुवतीनुसार  सुधारणे. अर्थात हे काम अतिशय संथ गतीने चालणार पण आपण त्यात निश्चीत प्रगती करणार. त्यातून सर्वमान्य होणारे शब्द हे आपण सर्वजण वापरणार आणि नंतर ते मनोगतावरून बाहेरच्या मराठी माणसांपर्यंत पोचणार आणि ते शब्द सर्व जण वापरणार.

तो पर्यंत आपल्याला असे सर्व शब्द जसे आहेत तसे (म्हणजे इंग्रजीत ) वापरावे लागणार (अपरिहार्य).

२)या मनोगताच्या माध्यमातून बाकीच्या मराठी शब्दांचा वापर आणि शक्य त्या सर्व ठिकाणी मराठीतूनच व्यवहार (बोलणे, लिहीणे इ. ).  त्या साठी ज्यांना मराठीसाठी अडचणी आहेत (उदा. मराठी प्रतिशब्द, म्हणी इ ), त्यांचे निराकरण करणे  म्हणजे ते शब्द आपोआप बोलीभाषेत वापरले जाउन रुळले जातील. 

(या दोन्हीमुळेच आपली मराठी भाषा संपूर्ण आणि समृद्ध होईल. आणि आपल्या सर्वांची अशीच इच्छा आहे !! )

या दोन्ही मुद्द्याचा एकत्रित विचार जर केला तर असे म्हणता येईल कि भाषांतराची गरज आहेच पण ते करताना त्यावेळेच्या परिस्थितीचा विचार करून (आपण कोणाशी संवाद साधतो आहोत, विषय काय आहे, ठिकाण कोणते  इ. इ. ) त्याप्रमाणे जाणीवपूर्वक वावरावे लागेल आणि आपण सर्व जण त्याप्रमाणेच वागतो.

अशा प्रकारच्या नाइलाजामुळेच, माझ्या मते म्हणूनच आज सर्वत्र मराठी - इंग्रजी यांची मिसळ करून एक नवीनच संवादाची भाषा (Communication Language) तयार झाली आहे आणि सर्वत्र वापरात आहे.

ज्या ज्या ठिकाणी असे नवीन शब्द लागतील त्या त्या सर्व ठिकाणी जाणीवपूर्वक मराठी शब्द (शोधून, वापरून) रूळवावे लागतील.  आणि या मनोगताच्या माध्यमातून, मला असं वाटतं कि ते आपण सर्व जण करतोच आहोत.

सर्वात मोठा धोका म्हणजे " मराठीला तारक किंवा मारक आपणच असू (सर्व मराठी लोकच)".

प्रसाद.