'संस्कार' ह्याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे 'प्रक्रिया'. (श्री. कुशाग्र ह्यांनीही हाच अर्थ दिला आहे.)
एखाद्या वस्तूवर संस्कार करून, प्रक्रिया करून त्या वस्तूच्या गुणवत्तेत बदल करण्यात येतो. जसे, सोन्यावर संस्कार करून सोनार दागिने घडवितो. वेगवेगळे संस्कार वेगवेगळे दागिने घडवितात. जसे, हार, अंगठी, कानातले इत्यादी. त्यामुळे संस्कार म्हंटले की सगळे हारच तयार केले पाहिजेत असा समज करून घेणे चुकीचे होईल. तेच रामरक्षा, इसापनीती इत्यादी साहित्या बद्दल म्हणता येईल. त्यामुळे अमुक एक चांगले, अमुक एक वाईट (किंवा चुकीचे) असे म्हणता येणार नाही. हे सर्व आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवितात म्हणून आवश्यक आहेत.
संस्कार फक्त घरातूनच होतात हा ही मोठा गैरसमज आहे. जन्मलेल्या मुलावर घरातले सर्वच जणं, कळत न कळत, संस्कार करत असतात. त्यातून ते मूल एक-एक गोष्ट शिकत जातं, त्याचं 'व्यक्तिमत्त्व' आकार घेऊ लागतं. पुढे ते मूल शाळेत जाऊ लागतं. तिथे शिक्षणाबरोबर (पुस्तकी ज्ञानाबरोबर) ते मूल सहजीवन शिकतं. चर्चांमध्ये, भाषणांमध्ये, नाटकांमध्ये भाग घेऊन धारिष्ट्य, पाठांतर आदी संस्कार लेऊ लागतं. ह्याच वेळी घरी रामरक्षा किंवा इतर कुठलेही श्लोक वगैरेंचं पाठांतर करून स्पष्ट उच्चार शिकतं. ह्याचा असा अर्थ अजिबात नाही की जे रामरक्षा किंवा इतर कुठले श्लोक, प्रार्थना शिकत नाहीत त्यांचे उच्चार स्पष्ट नसतात. परंतु, रामरक्षा, देवांच्या प्रार्थना, इतर श्लोक इत्यादींमुळे मुलाच्या जीभ, गाल, ओठ इत्यादी अवयवांना रोज ठरावीक व्यायाम मिळून स्पष्टोच्चारासाठी आवश्यक ती ताकद त्यांना प्राप्त होऊन स्पष्टोच्चार सहज, विनासायास अंगवळणी पडतात. ह्या महत्त्वाच्या मुद्द्यामुळे श्लोक शिकविणाऱ्या पालकांना श्लोकांचे अर्थ माहीत असणे आवश्यक ठरत नाही (असल्यास उत्तम, पण आवश्यक नाही). उच्चार ज्ञान आवश्यक आहे. तेही १००% असेल तर उत्तम नाहीतर ६०% असेल तरी चालेल. पण, 'श्लोकांचा अर्थ माहीत नसेल तर असे श्लोक शिकवूच नये' हे म्हणणे, म्हणूनच चूक आहे.
डॉक्टर गोळ्या देतो तेंव्हा त्या गोळ्यांनी तुम्हाला बरे वाटेल असे सांगतो. त्या गोळ्यांमध्ये exactly काय औषध आहे त्याचा शरीरावर कसा परिणाम होणार आहे इत्यादी माहिती देत बसत नाही. रूग्णाच्या दृष्टीने ती तितकीशी आवश्यकही नसते. पालक शिकवतात की 'विष खाऊ नये. त्याने मृत्यू येतो.' ही माहिती देताना त्या विषाने शरीरात नक्की काय बदल घडणार आहे, म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होतील, की रक्ताचे पाणी होईल, की हृदयाचे स्नायू आकुंचन पावून हृदय बंद होईल, हे पालकांना ठाऊक नसतं. म्हणून काय त्यांनी हे ज्ञान मुलाकडे परावर्तित करू नये?
पुढे मूल मोठे होऊन महाविद्यालयात जाते, इतर वाचन करते, समाजातील विविध घटकांमध्ये मिसळून चर्चा करून ज्ञान प्राप्त करते. हा व्यक्तीवर होणारा सामाजिक संस्कार म्हणावा लागेल. ज्या प्रकारची पुस्तके वाचतो ते ते लेखक त्या व्यक्तीवर विशिष्ट संस्कारच करत असतात. मनोगतावरही मनोगतींवर संस्कार होत असतात.
ह्या सर्व संस्कारांमधून चांगले काय, वाईट काय ह्याचे ज्ञान होऊन चांगल्या वाईटांच्या परिणामांचेही ज्ञान होते आणि काय घ्यावे, काय सोडून द्यावे ह्याचे संस्कार होत जातात. वेगवेगळ्या अनुभवांतूनही संस्कार होत जातात.
व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाच्या आकलन शक्ती प्रमाणे, बौद्धिक कुवती प्रमाणे ती व्यक्ती सभोवतालातून चांगले वाईट संस्कार स्वीकारत असते आणि तसे तसे व्यक्तिमत्त्व घडत जाते.
नुसतं पाठांतर करावं असा आग्रह कोणीच धरत नाही. जिथे जिथे आपण काय पाठ करतो आहोत हे जाणणं आवश्यक असतं तिथे तिथे ते जाणून पाठांतर करणं केंव्हाही चांगलंच. पण कधी कधी, 'काय' पाठ करतो आहोत हे समजण्यापेक्षा 'कशाकरता' करत आहोत हे जाणलं तरी खूप झालं. जसे, श्लोकांचे पाठांतर (स्पष्टोच्चारासाठी).
काही काही संस्कार कालबाह्य होतात की काय असाही प्रश्न पडतो. उदा. पूर्वी कर्ज काढू नये. असा सरसकट संस्कार घरातून, शाळेतून केला जायचा. पण हल्ली घरासाठी कर्ज, गाडीसाठी कर्ज, उच्चशिक्षणासाठी कर्ज, परदेशगमनासाठी कर्ज अशी अनेक समाजमान्य कर्ज आपण काढतो. 'अतिथी देवो भवो' हा संस्कार महागाईमुळे कालबाह्य होत चालला आहे. 'पांघरूण पाहून हातपाय पसरावे' हा संस्कारही 'पांघरूण मोठे का शोधू नये?' ह्या विचारांनी मागे पडत आहे. म्हणजेच काही काही संस्कार कालबाह्य होत आहेत. पण म्हणून त्या त्या काळात त्यांचे काही महत्त्वच नव्हते असे नाही.
कसं वागावं, कसं बोलावं, सडेतोडपणा म्हणजे काय, कुठे सडेतोड असावं, कुठे स्पष्टवक्ते असावे ह्यावर पानेच्या पाने खर्च होतील पण विषय संपणार नाही.
असो.
मला जे म्हणायचे आहे ते, अंशतः, मी मांडू शकलो आहे, असे मला वाटते.