मुख्यतः सर्व प्रकारचे रस पोटात जायला हवे. कारले कितीही कडू लागले तरी खायला हवे. मधुमेहींनी कडुनिंबाची भुकटी करून नियमितपणे पाव-अर्धा चमचा खाल्लेली बरी.

तेलाचा वापर कमीत कमी करावा हे पटले पण तेलाशिवाय कणीक नीट मळली जाईल का असा प्रश्न पडतो. मला तरी वाटते तेल कमी करण्यासाठी अशाप्रकारे कमी न करता तेलकट/तुपकट पदार्थ टाळणे उत्तम. पण तेल आणि तूप टाळण्याचा अतिरेकही होता कामा नये.

शक्यतेव्हा पदार्थ तळून खाण्यापेक्षा, भट्टीतून फोडून घेतलेला चांगला. आहारात ज्वारीच्या लाह्या, साळीच्या लाह्या यांचा वापर असावा.   

साखरेऐवजी शक्य तिथे गुळाचा किंवा ब्राऊन साखरेचा किंवा मधाचा वापर केलेला चांगला. मुद्दाम प्रत्येक भाजीत गूळ/साखर घालणेही टाळावे.

उसळी आठवड्यातून १-२ दिवस खाणे उत्तम. पालेभाज्यांचा वापरही तेव्हढाच वाढायला हवा. शक्य असेल तेव्हा पालेभाज्या शिजवून त्याचे पाणी टाकून न देता तेही वापरात आणावे. उसळी शिजवल्यावरही त्याचे पाणी फेकून न देता त्याचे 'कळण' करावे. तसेच बीट, गाजर, काकडी, मुळा इ. कच्चे पदार्थही नियमित खाल्ले जावे.

प्रत्येक मोसमातील फळ खाणे कधीही चांगलेच पण त्याचा अतिरेक होता कामा नये. बिगरमोसमी फळे शक्यतो टाळावीत. उदा. पावसाळ्यात/थंडीत थंड गुणाचे कलिंगड खाणे टाळलेलेच बरे.

नाचणी, ज्वारी, बाजरी यांचा वापर वारंवार करावा. अर्थातच हवामान पाहूनच. हिवाळ्यात नाचणी खाणे वेडगळपणाचे ठरेल.

आहाराकडे संख्यात्मक दृष्टीने  (उदा. वाट्या-चमच्याने मोजून मापून खाणे) न पाहता गुणात्मक (त्यातून मिळणारी पोषणमूल्ये) दृष्टीने पहावे.

तसेच नुसते मिताहार (भाष यांचे आभार) करून भागणार नाही तर जोडीला व्यायामही पाहिजे. उद्वाहनाऐवजी जिन्याचा वापर करावा. फरशा पुसणे, केर काढणे यासारख्या गोष्टी स्वतः केलेल्या चांगल्या. अर्थातच नोकरीमुळे या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही पण निदान आठवड्यातून एकदा तरी या गोष्टी केल्या जाव्या. टेबल-खुर्चीवर बसून जेवण्याऐवजी खाली बसून मांडी घालून जेवणे चांगले. या निमित्ताने कधीतरी गुडघेही दुमडले जातात मांड्यांच्या स्नायूंना ताणही बसतो आणि ऊठबस करावी लागल्याने शरीराची हालचालही होते.   

प्रत्येक माणसाची शारीरिक कुवत वेगवेगळी असल्याने पुस्तकात (सर्वसाधारण व्यक्तींसाठी) दिल्याप्रमाणे आहार बदलू नये. यासाठी आहारतज्ज्ञाचा सल्ला घेतलेला कधीही चांगला. कारण एखाद्याला दिवसात २ पोळ्या खाणेही शक्य होत नसेल तर एखाद्याला उपाशीपोटी रहावे लागेल. 'मिताहार' म्हणजे उपाशी राहणे नसून संतुलित आहार आहे.

आवांतर : रोहिणीताई हे काय भलतेच. म्हणजे आता तुम्ही पाककृती लिहिणे सोडणार की काय ? किती लोकांच्या जिभेचे हाल होतील त्यामुळे !