परवलीच्या शब्दावरून आमच्या बँकेत घडलेला एक प्रसंग आठवला. पूर्वी लॉकर उघडताना परवलीचा शब्द द्यावा लागे. एक जोडपे नवीन लॉकर
भाड्याने घ्यायला आले तेंव्हा त्यांच्याकडे परवलीचा शब्द मागितला. ती दोघही विशेष शिकलेली नव्हती. त्यामुळे परवलीचा शब्द म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हते. एखादे देवाचे, गावाचे, मुलाचे किंवा फुलाचे नाव सांगा असे सांगितल्यावर त्यांनी बरीच चर्चा करून 'गुलाब' हा शब्द ठरवला.नंतर लॉकर उघडायला आले तेंव्हा त्यांना फक्त कुठल्यातरी फुलाचे नाव त्यांचा परवलीचा शब्द आहे एवढेच आठवत होते. मग त्यांनी गुलाब सोडून सगळ्या फुलांची नावे घेतली. त्यांचाच लॉकर आहे हे मला माहीत होते. पण परवलीच्या शब्दाशिवाय माझा भित्रा ऑफिसर त्यांना लॉकर उघडू देणार नाही याची मला कल्पना होती. तो दक्षिण भारतीय होता. म्हणून मी हळूच त्या बाईला म्हटले," एखादं काटेवालं फूल सांगा की." तिला लगेच गुलाब आठवला आणि एक पेचप्रसंग पार पडला.