आयुर्वेदातील नाडीपरीक्षा माझ्या जवळच्यांनी अनुभवली आहे, ज्यात कसलेला वैद्य (मिलिंन्दराव नव्हेत!) लगेच रोगाचे मूळ सांगतो आणि मग साहजिकच चांगले उपचार करतो. प्रश्न आहे ते ज्ञान आत्मसात करण्याचा.
आयुर्वेद वैद्य हा विषय आला म्हणून एक गोष्ट आठवली, स. कृ. देवधर यांच्या 'गायत्री उपासना' या विषयावरील पुस्तकातील त्यांच्या अनुभवाची. देवधर एका वैद्याला भेटायला गेलेले असतात. हे वैद्य स्वतः गायत्रीची उपासना करणारे होते. कोणी रुग्ण नसल्यामुळे दोघांच्या गप्पा चाललेल्या असतात. खूप मोठे अंगण आणि त्यात फाटकापासून घराच्या दारापर्यंत बरेच अंतर. वैद्यांची बसायची जागा अशी होती की फाटकापासून दारापर्यंतचे सर्व त्यांच्या दृष्टिपथातले. गप्पा चालू असताना एक रुग्ण येतो, समोर बसतो, वैद्य त्याला काही पुड्या बांधून देतात आणि रुग्ण निघून जातो. रुग्ण-वैद्य ह्यांच्यात एक चकार संभाषण नाही. देवधरांना वाटले की कोणी जुना रुग्ण असावा आणि नेहमीप्रमाणे औषध घेऊन गेला. तरीपण त्यांनी सहज विचारले की हा माणूस केव्हापासून औषध घेतोय. वैद्य म्हणाले, आज प्रथमच तो आलाय. आता देवधरांवर चाट पडण्याची पाळी होती. धक्क्यातून सावरून त्यांनी विचारले की मग आपण त्याला काही न विचारता कसे औषध दिलेत ? वैद्य म्हणाले, मी गायत्री उपासक आहे. माझी सर्व इंद्रिये अतिशय शुद्ध आहेत, माझे शरीर शुद्ध आहे. रुग्ण जेव्हां फाटकातून आत शिरतो तेंव्हापासून तो कसा चालतो, कसा बसतो, त्याचे हावभाव, त्याचा चेहरा, त्याचे डोळे जे काही दर्शवितात त्यावरून त्याच्यात कोणकोणत्या अवयवात दोष आहेत आणि त्याला नेमके काय होतेय याचे मला अचूक निदान करता येते आणि त्याप्रमाणे मी औषधाची योजना करतो. या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेच्या level चा प्रश्न आहे. आणि वैद्याच्या विधानात जर कोणाला दर्पोक्ती वा अहं दिसला तर एवढेच म्हणायचे आहे की देवधरांनी विचारल्यावरच वैद्याने स्पष्टीकरण दिले, स्वतःची महती सांगण्याकरिता आपणहून केलेले विधान नव्हे.