बऱ्याच गोष्टी अनुभवाच्या असतात
मी कुष्ठरोगाचाही अनुभव घेऊ इच्छित नाही आणि लोखंडाचा रसही पिऊ इच्छित नाही. ह्या दोन गोष्टी मी करू इच्छित नाही म्हणून, मी आपल्या विधानांवर विश्वास ठेवावा हा दुराग्रह झाला.

(पात्रता म्हणणार होतो, पण वाटले वाद निर्माण करणारा शब्द)
अरेरे! शंकराचार्यांच्या अनुयायाला दुसऱ्याला 'अपात्र' संबोधून कमी लेखण्याचा मोह टाळता आला नाही. त्यांनी तर (आपण पुरविलेल्या माहितीनुसार) समाजाने टाकलेल्या, घातक, जीवावर बेतणाऱ्या, संसर्गजन्य रोग्यालाही कमी न लेखता बरोबरीचे मानून मिठीत घेतले. ह्यांतील भावार्थ लक्षात आला असता तरी वरील प्रमाद घडला नसता. असो. आम्ही तर पामर. तरीही आपल्याकडून दुसऱ्याचा असा अपमान होऊ नये म्हणून प्रयत्नशील असतो. अजून तरी अपयश आलेले नाही.

ही उदाहरणे योग्य नाहीत मला माहीत आहे
मग, योग्य उदाहरणे द्या नं!

पण ह्या गोष्टी आता 'अगम्य' रहिल्या नाहीत एवढेच दाखवायचे होते
अशा विधानांनी, भविष्यात कधीतरी, नुसते मिठ्या मारून, रोग बरे करता येतील आणि माणूस लोखंडाच्या रसावर जगू लागेल, असे आपल्याला म्हणायचे आहे का? स्पष्ट लिहा.

पण हे मी प्रत्यक्ष पाहिले तेव्हां पटले.
मीही शंकराचार्यांना कुष्ठरोग्याला मिठी मारून त्याचा रोग बरा करताना आणि सतेज कांती बहाल करताना पाहिलेले नाही. तसेच लोखंडाचा रस पिताना पाहिलेले नाही तेंव्हा आपल्या प्रमाणेच, इतरांनाही, स्वतः पाहिल्यावर विश्वास ठेवण्याची, मुभा आहे का?

पण हीच रेकी माझ्या मुलाला परीक्षेच्या वेळी लागू पडत नाही. आता. कोणी फोन करून सांगतात 'कान दुखतोय, रेकी पाठव. आणि अर्ध्या तासाने फोन येतो 'कान दुखायचा थांबला'. कधी कधी असे होतही नाही.

रेकी हा विषय, मी वाद घालावा इतका, मला अजून समजलेलाच नाही. अनुभवांच्या यादीत माझ्या जवळही स्वानुभवांचा बराच मोठा संग्रह आहे. त्यात, मनाची ताकद, मनकवडेपणा, मनातून मनाकडे संदेशवहन इत्यादी बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांचे उत्तर मलाच न मिळाल्यामुळे मी त्या मनोगतावर देत नाही. आणि कधी द्याव्याश्या वाटल्याच तर, ललित लेखन म्हणून, 'कट्ट्यावरच्या गप्प' ह्या सदराखाली देईन. त्यात माझी महानता वगैरे अधोरेखित केलेले नसेल.

शंकराचार्य धर्म जागृतीचे काम करत होते. कोणावर इंप्रेशन मारण्यासाठी हे (आणि असेच अजून काही आहेत) केले असे मला वाटत नाही.
शंकराचार्यांनी हे 'केले' ह्या विधानावरच माझा आक्षेप आहे. कशासाठी केले हा प्रश्नच उद्भवत नाही.

आपण सुशिक्षितच अंधश्रद्धेलाच श्रद्धा म्हणत, असे अनेक चमत्कार, त्या महान आत्म्यांच्या नांवाला, कारकीर्दीला चिकटवत त्यांच्या (ज्या काही असेल त्या) मूळ शिकवणीला दृष्टीआड करण्यात आघाडीवर आहोत मग अशिक्षितांचे काय? ते केंव्हा अंधश्रद्धा आणि अतार्किक रूढी परंपरांचे, कर्मकांडांचे जोखड फेकून देण्याइतके ताकदवान होणार? कधी विज्ञानाची कास धरणार? कधी बुद्धिप्रामाण्य स्वीकारणार? धर्ममार्तंडांच्या चमत्कारांपेक्षा, आत्मोन्नतीसाठी, समाजोन्नतीसाठी त्यांची विधायक शिकवण ह्यांचा कधी प्रसार करणार?

सारेच धूसर आहे.