श्री. अत्यानंद,
कोणत्याही कथानायकाचे मोठेपण बिंबवण्यासाठी अशा तऱ्हेच्या चमत्काररुपी कुबड्या वापरण्याची तथाकथित भक्तांमध्ये चढाओढ लागत असते
आपले म्हणणे बरोबर आहे असे वाटते. पूर्वीच्याकाळी, विद्येचा, ज्ञानाचा प्रसार आजच्या इतका झाला नव्हता. पण, लोकांची देवावर श्रद्धा होती. त्याच्याकडे लोकं तारक म्हणून पाहत होते. शंकराचार्यांसह काही ज्ञानी माणसांकडे समाजप्रबोधनाची ताकद होती, ज्ञान होते. पण, एका सामान्य माणसाचे कोण ऐकणार? म्हणून अशा खोट्या चमत्कारांच्या प्रसारातून त्यांना देवत्व बहाल करायचे प्रयत्न त्यांचे शिष्य (गुरुंच्या संमतीनेच) करीत आणि एकदा गुरुंचे स्थान सर्वसामान्य मर्त्य मानवाच्या वर प्रस्थापित झाले की त्याचे तत्त्वज्ञान समाजातील सर्व स्तरांत झिरपू लागे. त्या काळात कदाचित त्याची आवश्यकताच असेल. जसे, उपास-तापास. 'लंघन करा, लंघन आरोग्यासाठी उत्तम असते' हा उपदेश लोकांच्या 'पचनी' पडत नाही. गंभीर व्याधिग्रस्त होई पर्यंत पटत नाही आणि तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून पुन्हा लोकांच्या श्रद्धेचाच वापर करून लंघनाला उपवास संबोधून, देवपूजेचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. समाजाला पटले आणि समाज लंघन करू लागला.
शिवाजी महाराजांच्या अफजलखान भेटी पूर्वी अफजलच्या सैनिकी ताकदीने, क्रूर वृत्तीने महाराजांचे मंत्रिमंडळ, सरदार, सामान्य सैनिक, सर्वांच्याच मनात महाराजांच्या सुरक्षिततेविषयी साशंकता निर्माण झाली होती. ही साशंक अवस्था यशाच्या मार्गात भयंकर घातक होती. म्हणून, महाराजांनी, 'भवानीमातेने स्वप्नांत दृष्टांत देऊन 'राजा तुझाच विजय होईल' असा आशीर्वाद दिल्याची' आवई उठवली. सर्वांचा त्यावर विश्वास बसला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. महाराजांनी लोकांच्या श्रद्धेचा विचार करूनच त्यांच्या मनात आत्मविश्वास उत्पन्न केला.
ज्ञानाचा पुरेसा प्रसार झालेला नसताना असे चमत्कार समाजाच्या भल्यासाठीच वापरणे त्या काळात कदाचित समर्थनीयही असेल. परंतु, आजच्या काळात त्या माहात्म्यांची शिकवण 'डायरेक्ट मेथडने' लोकांपर्यंत पोहोचवावी. चमत्कारांचे अवगुंठन अनावश्यक, प्रसंगी उद्देशच मारून टाकणारे ठरते.
म्हणूनच जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अशा गोष्टींना मरण नाही असे वाटते
ही मानसिकता बदलावी म्हणूनच आजच्या समाजासमोर चमत्कारांची रोषणाई करण्यापेक्षा ज्ञानाचा दिवा लावावा. 'चमत्कार' त्या काळातली गरज होती आता तशी उरली नाही. तेंव्हा चमत्कार विसरा आणि शंकराचार्यांच्या शिकवणीचा प्रसार करा. हेच मी सांगू इच्छितो.
प्रियाली ह्यांच्या मताशीही मी सहमत आहे. हल्लीच कुठेतरी वाचले होते. विज्ञानाच्या प्रसाराने अंधश्रद्धा दूर होईल असे वाटायचे. परंतु, विज्ञानाच्या प्रसाराबरोबरच लोकसंख्येवर आळा न घातल्याने स्पर्धा वाढली, उत्पन्नाचे स्रोत तितकेच राहून खाणारी तोंडे वाढली. स्पर्धेमुळे असुरक्षितता वाढली, वैफल्य वाढले आणि भीतीने ग्रासलेली माणसं तारणहार म्हणून पुन्हा देवाच्या चरणी धावू लागली. १९७३ सालच्या (तेंव्हा पासून मी पाहतो आहे म्हणून माहीत) सिद्धिविनायक समोरील रांग आणि आजची रांग, अंधश्रद्धेचा दर्जा ह्या सर्वातच लक्षणीय वाढ झाली आहे.
आजतक, सारखे चॅनल्स, तासातासाला, बातम्यांच्या नांवाखाली अंधश्रद्धांचा प्रसार करीत आहेत. 'वारदात' सारख्या कार्यक्रमातून खेडोपाडीच्या अंधश्रद्ध घटनांना आपल्या चॅनल्सद्वारे, ज्यांना माहीत नाही, अशांपर्यंत पोहोचवत आहेत.
केंव्हा थांबणार हे? आपण आपली जबाबदारी केंव्हा ओळखणार? चमत्कारांचा भाग वगळून मूलभूत तत्त्वांची शिकवण आपण कधी प्रचारात आणणार? कुणास ठाऊक.
असो.