डॉ. विजया मेहता ह्यांच्या शिबिरात त्यांनी सांगितलेली एक गोष्ट पटली. जी भूमिका आपण करतो आहोत ती समजावून घेणे आणि महत्त्वाचे म्हणजे 'त्या' व्यक्तिमत्त्वाला आपल्यात 'उतरविणे' हे महत्त्वाचे. एकदा हे 'उतरविणे' जमले की अभिनय आपसूक येत जातो. हे 'उतरविणे' किंवा 'त्या' व्यक्तिमत्त्वाचा शोध हा तालमींमधून संपत नाही. कधी कधी सुरुवातीचे काही प्रयोग आपण नुसते दिग्दर्शकाच्या सूचनांचे पालन करीत पाठ केलेले भाषण रंगभूमीवर सादर करीत असतो. त्याच वेळी मनात व्यक्तिमत्त्वाच्या शोधाचे तुंबळ प्रयत्न चालू असतात आणि कधी कधी साक्षात्कार व्हावा तसा हा शोध लागतो. तिथून पुढे त्या भूमिकेतून प्रेक्षकांना ते व्यक्तिमत्त्व दिसायला लागतं. हा शोध कधी ५-६ प्रयोगांइतका छोटा असतो, तर कधी २४-२५ प्रयोगांइतका मोठा. कधी कधी नाटक बंद पडतं पण हा शोध लागत नाही. तिथे फार अस्वस्थ वाटतं.
डॉ. लागू म्हणतात, भूमिकेत शिरणे वगैरे बकवास आहे. असे होत नाही. होऊ नये. कुठलीही भूमिका करताना मी स्टेजवरही डॉ. लागूच असतो.
वेगवेगळे कलाकार वेगवेगळी अभिनय प्रक्रिया मानतात. 

शारीरिक हालचाल आणि आवाजाचा पोत, चढ-उतार आणि चेहऱ्यावरील हावभाव ह्यांच्यातील समन्वय 'त्या' व्यक्तिमत्त्वाचा शोध लागल्यावर जास्त प्रभावी होतात.