कृपया धर्म-वल्लींची (फ़रक-साधर्म्य) अशी सविस्तर चर्चा करतांना, हिंदू आणि वैदीक यांना एकमेकांचे समानार्थी शब्द म्हणून वापर करु नये.
माझ्या मते वैदीक, जैन, बौद्ध, चार्वाक, शीख, लिंगायत, द्वैताद्वैत, शैव, वैष्णव यांना कितीही कंठशोष करून वेगळे धर्म सिद्ध करायचा प्रयत्न केला, तरी त्यांमधे आणि त्यांच्या अनुयायांमधे इतकी प्रचंड वांशिक, तात्त्विक, रूढी-रिती-रिवाज, जन्मविधी, मरणविधी, देवदेवता यांची सरमिसळ आहे की त्यावर दोन्ही बाजूंनी बोलता येईल. एवढे करुन त्यांना हिंदू नावाखाली ना एकछत्री अंमला खाली आणता आलं, ना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ करता आलं. ते असो.
वृषभदेवांचा उल्लेख वेदांमध्ये आहे असं वाचण्यात आलं आहे. जिना (ज्ञानाचा अपभ्रंश) हा शब्द नक्कीच महावीरपूर्व आहे. प्रकृती देव निर्मित नाही, देव जगत-निर्माता नाही, नियंता मात्र आहे, कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे ज्ञान, ज्ञान सगळ्यांनी मिळवायचा प्रयत्न करायला हवा, ज्ञान प्राप्ती नंतर मोक्ष आहे आणि मग पुन्हा जन्म-मृत्यू चा फ़ेरा नाही या संकल्पनेवर आधारित ही धर्मवल्ली. सांख्यमताच्या जवळचा हा वाद पूर्णपणे निरिश्वरवादी नाही. महावीरांनी ह्याची स्थापना केली किंवा धर्म म्हणून अधिष्ठान प्राप्त करून दिले असे म्हणतात, परंतू, जैनांचे षोडशोपचार, तिर्थंकर होण्याकरता मुलाच्या आईला पडणारी स्वप्ने (लांच्छ्णा?) वैगेरे समजूती, प्रत्येक कल्पात होणारे एकूण २४ तिर्थंकर ही संख्या, पूर्वी होवून गेलेले तिर्थंकर ही अशी पार्शभूमी पूर्वीच तयार होती. नमो जियाणं हा मंत्र मात्र महावीरस्वामींनी दिला असे म्हणतात. २३ वे आणि २४ वे तिर्थंकर यां मधे सुद्ध हजारो वर्षांचा काळ उलटून गेला असे जैन लोक म्हणतात.
आता हिंदू शब्दाचा इतिहास पाहाता, जैन लोक हिंदू नक्कीच आहेत, ते वैदीक मात्र नाही. तीच कथा भारतात जन्मलेल्या इतर संप्रदायांची, त्यांच्या तथागतांची, देवांची; सगळे हिंदूच पण वैदीक असतीलच असे नाही.