१. धम्मचक्रप्रवर्तनसोहळ्यास येणारे लोक कुठल्याही ठिकाणाहून त्यासुमारास नागपुरास येत असतील तर त्यांच्या नेत्यांनी त्यांचा असा गाढ समज करून दिलेला असतो की त्यांना त्यावेळी रेल्वेने मोफत जाण्याची खास सोय शासनाने केलेली आहे. मी स्वत: अनेक प्रवाशांना रेल्वेत तसे विचारून खात्री करून घेतलेली आहे. त्यांचे नेते डॉ.आंबेडकरांच्याच शिकवणीविरुद्ध असे का वागतात? त्यांच्या ह्या वागणूकीने बेशिस्त वागणाऱ्यांना प्रोत्साहन मिळून शिस्तीने वागणाऱ्या, पदरमोड करून प्रवास करणाऱ्यांना ते लोक भिकाऱ्याची अवस्था प्राप्त करून देतात. डॉ.आंबेडकरांच्या न्यायाधिष्ठीत समाजासाठी तळमळणाऱ्या मनाला, ते जर आज हयात असते तर किती त्रास झाला असता?
धमचक्रप्रवर्तन केलेले लोक असेच वागणार असतील तर ते अपप्रवृत्तींना आसरा देणारे ठरेल. आणि कायद्याच्या राज्याला आव्हान ठरेल.
धार्मिक यात्रा करणाऱ्या प्रत्येकास स्वत:चा खर्च स्वत: करावयाचा आहे ह्याचे पूर्ण भान असते. दयाधर्माच्या पैशावर अथवा गुंडागर्दीच्या पैशावर प्रवासाची चंगळ करण्याची प्रवृत्ती पापभीरू धार्मिक लोकांत सामान्यत: दिसून येत नाही.
२. धम्मचक्रप्रवर्तनसोहळ्याचे संयोजक आजवर ह्या सोहळ्याचे संयोजन इतर नागरीकांना (घाणीचा, गुंडगिरीचा) त्रास होणार नाही ह्या पद्धतीने का करू शकले नाहीत ह्याचा त्यांनी शोध घेण्याची गरज आहे. दीक्षाभूमीच्या आसपास राहणाऱ्यांच्या माथी नरकवास मारणे हे बौद्धधम्मास खचितच अभिप्रेत नसावे.
३. धर्म कुठलाही असो. मात्र, देशवासियांना त्रासदायक न ठरता त्यांना तो उपयोगी ठरावा हीच त्याचेकडून सार्वत्रिक अपेक्षा नसते का?
४. ह्या मुद्द्यांना सोहळ्याच्या समर्थकांनी योग्य उत्तरे न चिडता द्यावीत अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे.