अनुप्रिताची आणि वेदश्रीचीही गोष्ट आवडली. दोघींच्यावर माझीही एक.
एक सॉफ्टवेअर इंजिनिअर (आपण त्याला हिमेश म्हणूया.)एका तळ्याकाठी आपल्या लॅपटॉपवर काम करत बसला होता. लॅपटॉप फार जुना झाला असल्यामुळे कामात सतत अडथळा येत होता.हिमेश त्यामुळे फार कंटाळला होता.इतक्यात त्याला आठवले की याच तळ्यातल्या जलदेवतेने त्याच्या लाकूड तोडणाऱ्या खापरपणजोबांच्या प्रामाणिकपणावर खूश होऊन त्यांना चांदीची आणि सोन्याची कुऱ्हाड बक्षीस दिली होती. त्याने आपला लॅपटॉप पाण्यात फेकून मोठ्याने गळा काढला. त्याचे रडणे ऐकून जलदेवता अवतीर्ण झाली. तिने विचारले," वत्सा, तू असा दु:खी का?"
हिमेश म्हणाला," देवी तुला काय सांगू? माझे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन, माझा लॅपटॉप पाण्यात पडला. आता मी माझे व माझ्या कुटुंबाचे पोट कसे भरू?"
देवी म्हणाली," रडू नकोस.मी तुझा लॅपटॉप आणून देते." तिने डुबकी मारून एक डायरी आणली आणि विचारले,"हा तुझा लॅपटॉप?"
हिमेश मनात म्हणाला अरे देवा, या देवीला लॅपटॉप म्हणजे काय तेही माहीत नसावे. त्याने मानेनेच नाही म्हटले. देवीने दुसरी डुबकी मारली आणि एक मोठी आगपेटी आणली. आता हिमेशचा धीर सुटला. तो रागाने देवीला म्हणाला," डायरी काय आणतेस, आगपेटी काय आणतेस, स्वतः:ला देवी म्हणवतेस आणि लॅपटॉप कसा असतो तेही तुला माहीत नाही? खापरपणजोबांना मदत केलीस म्हणून तुझ्या भरवशावर मी माझा लॅपटॉप पाण्यात टाकला. अडकत अडकत का होईना चालत होता. आता पाण्यात पडून काय वाट लागली असेल कुणास ठाऊक."
हे ऐकून देवी खूप रागावून म्हणाली," ढोंगी माणसा, प्रामाणिकपणाचे सोंग आणून मला फसवायला निघाला होतास? तुझा लॅपटॉपही तुला मिळणार नाही. आणि मूर्खा,ती डायरी आणि आगपेटी नव्हती. ते नवे पामटॉप होते. "
तात्पर्य : सॉफ्टवेअर इंजिनिअरांना हार्डवेअर मधले काही कळत नाही.