धन्यवाद, साती, चित्त, पेठकरसाहेब, विशारदा, प्रसाद, नंदन, भार्गवराम, क्लिंटन, समशेर, सुचरिता आणि खुशी!!
खुशी, तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. आपल्या इथे सरकारी यंत्रणा इतकी ढिसाळ आणि कामचुकार आहे की मनःस्तापाशिवाय काही हाती लागत नाही. त्यावेळेस वाटतं की या भारत देशाविषयी अभिमान वाटावा असं या देशाने काय दिलं आहे? "देश तुम्हाला काय देतो यापेक्षा तुम्ही देशाला काय देऊ शकता" वगैरे फालतू आणि अतिआदर्शवादी तत्त्वांवर माझा बिलकूल विश्वास नाही. इतका जर आदर्श विचार लोकं करू शकले असते आणि महत्त्वाचं म्हणजे आचरणात आणू शकले असते तर मग सगळीकडे रामराज्य असले असते आणि हा विचार करण्याची गरजच पडली नसती. परवा एक स्कूटर खराब रस्त्यांवरून घसरून ट्रकखाली गेली आणि एक मुलीचा करुण अंत झाला. माझ्या सख्ख्या काकांना या वाईट रस्त्यांमुळे जबर किंमत मोजावी लागली. बरेच अपघात झाले. पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर हा रस्ता तर इतका वाईट झाला आहे की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची गाढवावरून धिंड काढावी असे वाटायला लागले आहे. बेशरमपणाचा कळस आहेत सरकारी कर्मचारी आणि स्वार्थी राजकारणी!! आपल्या वीज बोर्डामध्ये तर भ्रष्टाचार इतका आहे की मला त्या कर्मचाऱ्यांची किळस येते. अक्षरशः भीक मागतात हो हे लोकं! आणि याची त्यांना यत्किंचितही लाज, शरम वाटत नाही. पुणे पालिकेच्या महापौर रजनी त्रिभुवन यांनी राजकीय प्रतिमा सुधारावी या उद्देशाने एक खोटी खोटी डरकाळी फोडली होती की जर ४ दिवसात रस्ते चांगले झाले नाहीत तर राजीनामा देईन. ४ दिवसांनी त्यांनी स्वतःच जाहीर केले की आता सर्व रस्ते एकदम उत्तम अवस्थेत आहेत त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही! किती विनोदी प्रकार आहे हा! अजून ८०% रस्ते अतिशय वाईट अवस्थेत आहेत. अजूनही अपघात होत आहेत, लोकं मरत आहेत, काहींना आयुष्यभराची दुखणी लागत आहेत आणि या बाई म्हणतात की सगळे रस्ते चांगले झालेत. बेशरमपणाची हद्द ओलांडणे हा वाक्प्रचार देखील आता थिटा आणि कुचकामी वाटायला लागला आहे. आपले राजकारणी ही तसेच आणि सरकारी कर्मचारी ही तसेच! अशा अतिशय स्वार्थी, निर्लज्ज, गेंड्याची कातडी असलेल्या लबाड मूर्खांच्या हाती आपण देशाचा कारभार सोपविल्यावर देशाविषयी अभिमान वाटण्यासारखे काय घडणार आणि आपण सामान्य जन काय चांगल्या, सुसह्य आणि आनंदी आयुष्याची अपेक्षा ठेवणार?