माझ्या ह्या लिखाणाला एवढा भरघोस प्रतिसाद मिळेल असे मला अजिबात वाटले नव्हते. तेव्हा हा सुखद धक्का देणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक आभार. मी शीर्षकात म्हटल्याप्रमाणे हे तसे केरळचे वर्णन नाही. मी ते करायचा प्रयत्नही केला नाही कारण मला माझ्या मर्यादा माहीत आहेत! परत आल्यावर मैत्रिणीने "कशी झाली ट्रिप?" असे विचारल्यावर तिला जे सांगितले तेच मी मनोगतींना सांगितले आहे, थोडी प्रस्तावना आणि शेवट यांची भर घालून.
हे वाचून काहींना केरळ पहाण्याची इच्छा झाली हे वाचून बरे वाटले.
मिलींदराव(फणसे), तुमचा प्रतिसाद वाचून 'माझिया जातीचे' कुणीतरी भेटल्याचा आनंद झाला!
वैशालीताई, आता हे असंच. त्याला इलाज नाही!
__________
केरळमध्ये मला माझ्या अतिशय आवडीचा 'अवियल' नामक केरळी पदार्थ मनसोक्त खायला मिळाला. 'मला उमजलेले अवियल' असे:
सुरण, लाल भोपळा, पडवळ, भाजीची केळी ह्या (सर्वसाधारणपणे कुणाला न आवडणाऱ्या) भाज्या घ्याव्यात. शेवग्याच्या शेंगाही घ्याव्यात. भाज्यांचे लांबट तुकडे करून ते मीठ व हळद घालून उकडून घ्यावेत. त्यात भरपूर नारळ, हिरव्या मिरच्या व जिरे वाटून घालावेत. मग थोडे दही घालून एक उकळी आणावी. झाले अवियल तयार.
(कुणीतरी अवियलची अधिकृत कृति मनोगतावर द्यावी ही विनंती.)
जाता जाता आणखी एक सांगावसं वाटतं. आपण घरी हे अवियल करायचं म्हटलं तर ह्या सगळ्या भाज्या अगदी पाव/पाव किलो आणल्या तरी आपल्या चौकोनी/त्रिकोणी कुटुंबांसाठी त्या खूप होतात. त्यावरही तोड आहे. मुंबईत भाजीबाजारात अर्धा किलो 'अवियल मिक्स' मागितले की भाजीवाले सुरणाचा लहानसा तुकडा, एखादं केळं, भोपळ्याची छोटीशी फोड, पडवळाचा तुकडा इ. सर्व मिळून अर्धा किलो देतात. फारच सोयीचं होतं हे!
-मीरा