फणस सोलल्यासारखी कलाकृती सोलून काढायची, गरे फेकून द्यायचे आणि उरलेली गदळ चिवडत कापा चांगला की बरका याची चर्चा करत बसायचं यापेक्षा बाजारात मिळणारे फणसाचे गोड गरे खाणं मला अधिक चांगलं वाटतं.

यावरून सुचलेले काही प्रश्न -
वरील फणसासारख्या दिसणाऱ्या वाक्यातला गरा -माफ़ करा - मूळ प्रश्न (त्यातील पर्यायी कृती)  "गरे खावेत की फेकून द्यावेत?" असा आहे की यापेक्षा वेगळा? गरे फेकून द्यावेत असे कोणी कधी म्हणाले आहे का? पोटभर गरे खाऊन भरल्या पोटी त्याच्याच जोडीने चर्चा करता येत नाही का?
फणसाला कलाकृती समजल्यास तो सोलल्याशिवाय गरे मिळतात का?
घरी फणसाचे झाड असेल व स्वत: फणस सोलून, गदळ टाकून देऊन, स्वत:च्या हाताने गरे काढून खाणे हे एखाद्याला जमत असेल तरीही त्याने बाजारात मिळणाऱ्या गऱ्यांची आस धरावी का? दुसऱ्याला जमत नसेल तर त्याचे पोट दुखावे का?
समजा आपली आई वा वहिनी फणसाच्या त्या खास विळीवर हे सगळे करून भोवती जमलेल्या अधीर पोरांना प्रेमाने पोटभर गरे खायला घालत असेल तर त्या टोळक्यात घुसून आपण पोट तुडुंब भरेपर्यंत गरे खाणे हे अधिक आवडेल की बाजारात मिळणारे कागदात गुंडाळलेले चार-आठ गरे विकत घेऊन खाणे आवडेल?
बरे, यापुढे जाऊन कोणी गऱ्यांतून साखर निर्माण केली व त्यात थोडासा फणसाच्या वासाचा "इसेन्स" घालून विकली तर ती घेऊन खाणे हे गरे विकत घेऊन खाण्यापेक्षा कितीतरी अधिक चांगले नाही का?
कापा व बरका या दोन्ही प्रकारच्या गऱ्यांना आपापली वेगवेगळी गोडी म्हणा मजा म्हणा असते की नसते? काप्यातला करकरीत आंबटगोडपणा व बरक्यातला रसाळ गोडपणा हे दोन्ही चवीने, निवडून, मनसोक्त खावे की बाजारात जसले (फक्त) कापे गरे मिळतात ते गुपचुप खाऊन समाधान मानावे?

संजोप,
तुमचा मुद्दा नीट समजून घेऊनसुद्धा हे किंवा असे प्रश्न पडतातच.
(तुमचे लिखाण हलकेच न घेऊन या महफ़िलीत रसभंग केल्याबद्दल क्षमस्व.)
दिगम्भा