श्री. समीर सूर्यकांत,

आपल्या तळमळीतील शुद्धता वादातीत आहे ह्यात शंका नाही.

त्यावेळेस वाटतं की या भारत देशाविषयी अभिमान वाटावा असं या देशाने काय दिलं आहे?
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, हे म्हणण्याचे 'स्वातंत्र्य' दिले आहे. हे विधान मी २५ वर्षे आखाती देशात काढल्यावर मोठ्या अधिकारवाणीने करतो आहे.
दुसरे, 'प्रगती'. भारत-पाकिस्तात स्वतंत्र झाल्यानंतर दोन्ही देशांच्या स्वतंत्र वाटचालीतील ढोबळ फरक विचारात घेतला तरी भारताने चांगलीच प्रगती केली आहे. शिक्षणाच्या संशोधनाच्या 'संधी', मतपेटीद्वारे प्रस्थापित पण निष्क्रिय राज्य उलथवून टाकण्याची ताकद. आणि अनेक.
ह्याचा अर्थ असा नाही सर्वत्र सुबत्ता आणि सुख नांदते आहे. आपण म्हंटल्याप्रमाणे चुकीच्या, अन्याय्य, असामाजिक गोष्टीही बऱ्याच आहेत. सुधारणेला बराच वाव आहे. पण अगदी देशाभिमानच वाटू नये असेही वातावरण नाही. 'पुणे' म्हणजे 'देश' नाही. 
फक्त पुण्याचाच विचार केला तर आपले म्हणणे, थोडीफार अतिशयोक्ती वगळता, पटतेही. पण, मला नेहमी आश्चर्य वाटते. (तुमच्या बद्दल वैयक्तिक नाही, जनरल पुणेकरांविषयी..) प्रत्येक मुद्द्यावर हिरीरीने भांडणारे, शब्दांचा कीस पाडणारे, पुण्याचा अवास्तव अभिमान बाळगणारेही, पुण्यातल्या रस्त्यांच्या दुर्दशेवर स्थानिक राजकीय नेत्यांना जाब विचारत नाहीत. सामाजिक कारणांसाठी मोर्चे काढीत नाहीत, रस्ते अडवून साजरे होणाऱ्या उत्सवांविरुद्ध 'ब्र'ही काढत नाहीत. उलट, दगडूशेठच्या गणपतीपासून गल्लीतल्या दारूवाल्याशेठ पर्यंत सर्वच गणपतींच्या दर्शनासाठी गर्दी करतात. बेशिस्तीचे विराट प्रदर्शन करतात. रस्त्यावरच्या रहदारी नियंत्रकांना जुमानीत नाहीत, रहदारीचे नियम पाळीत नाहीत. वाहने उभी करून ठेवण्याचे (पार्किंग) नियम पाळीत नाहीत. आणि पुण्यातील जीवन आजकाल असह्य होऊ लागले आहे. असा गळा काढतात. मुंबईतही असे गुन्हे करणारे, बेशिस्त लोकं आहेत. पण प्रमाण फार कमी आहे. मुंबईत सर्वसाधारणपणे रहदारीला, पुण्यापेक्षा जास्त, शिस्त आहे. आणि रस्तेही चांगले आहेत.

परवा एक स्कूटर खराब रस्त्यांवरून घसरून ट्रकखाली गेली आणि एक मुलीचा करुण अंत झाला. माझ्या सख्ख्या काकांना या वाईट रस्त्यांमुळे जबर किंमत मोजावी लागली. बरेच अपघात झाले.

हे पुण्यातील विदारक सत्य आहे. कर्वे रस्ताही त्याला अपवाद नाही. कर्वे रस्त्याचा लौकिक तर माझ्या लहानपणापासून आहे. चंद्रावर यान उतरले आणि चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे वर्तमानपत्रात छापून आली तेंव्हा, विनोदाने, 'अरे, चांद्रयान चुकून पुण्यातील रस्त्यावर उतरले की काय?' अशी प्रतिक्रिया वर्तमानपत्रात छापून आली होती. असो. पण पुण्यात रस्त्यांच्या अशा दुरवस्थेवर मोर्चे निघाल्याचे, बंद पुकारल्याचे, मतदानावर बहिष्कार घातल्याचे किंवा 'ह्या कारणासाठी' एखाद्या राजकीय पक्षाला सत्तेपासून दूर ठेवल्याचे ऐकीवात नाही.

 पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर हा रस्ता तर इतका वाईट झाला आहे की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची गाढवावरून धिंड काढावी असे वाटायला लागले आहे. 
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची धिंड काढून काय होणार? राजकीय नेते, नगरसेवक ह्यांना जाब विचारला पाहिजे.

पुणे पालिकेच्या महापौर रजनी त्रिभुवन यांनी राजकीय प्रतिमा सुधारावी या उद्देशाने एक खोटी खोटी डरकाळी फोडली होती की जर ४ दिवसात रस्ते चांगले झाले नाहीत तर राजीनामा देईन.
महापौर हा नगरसेवकांच्या बैठकींमध्ये अध्यक्ष असतो. तिथे होणाऱ्या बैठकांमध्ये सर्वानुमते जे ठरते, जो ठराव पास होतो, तो महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचविणे, हे त्याचे काम असते. त्याला ती - ती कामे महापालिकेकडून करून घेण्याचे अधिकार नसतात. त्यामुळे 'खोटी डरकाळी' शब्द अयोग्य वाटतो. पुण्यातील 'रस्ते खराब आहेत ते ताबडतोब दुरुस्त करून घ्या' असा ठराव पास झाला तर तो आयुक्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम महापौर करतो. आयुक्तांनी, जमापुंजी कमी आहे, कर्मचारीवर्ग पुरेसा नाही, इतर महत्त्वाची कामे अजून प्रलंबित आहेत, त्यांची पूर्तता करण्यात महापालिका व्यस्त आहे, असे काही कारण देऊन रस्तेदुरूस्तीची टाळाटाळ केली तर, महापौर काही करू शकत नाही. हं, ज्या राजकीय पक्षाचे महापालिकेत सांख्यिक प्राबल्य असते ते पक्ष, दबावगट निर्माण करून आयुक्तांवर दबाव आणू शकतात. महापौरांच्या घोषणे नंतर, राजकीय नाचक्की टाळण्यासाठी, तसा दबाव गट तयार होऊन पुण्यातील रस्तादुरूस्तीचे (रस्त्यांना ठिगळे लावण्याचे) थोडेफार काम झाले. 

४ दिवसांनी त्यांनी स्वतःच जाहीर केले की आता सर्व रस्ते एकदम उत्तम अवस्थेत आहेत त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही!

महापौरांनी असे जाहीर केले असे, माझ्या तरी वाचनात आले नाही. अशी बातमी माझ्या नजरेतून सुटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, श्री. सुरेश कलमाडी ह्यांनी, पुण्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय चांगली आहे' अशा अर्थाचे विधान केले होते. त्यावर भयंकर गदारोळही उठला होता त्यावर, 'गतवर्षीचा पाऊस आणि ह्या वर्षीचा पाऊस पाहता पुण्यातील रस्ते खूपच चांगले आहेत' असे लटके स्पष्टीकरणही दिले होते. 'रस्ते सुधारले नाहीत तर माननीय कलमाडीजी आम्ही तुम्हाला/तुमच्या पक्षाला पुन्हा निवडून देणार नाही.' अशी त्यांना, जनतेने, स्वच्छ शब्दात समज देण्याची गरज आहे.  

आपल्या बाकी सर्व लिखाणाशी सहमत आहे.