दादरकर, तुम्ही दिलेली कथादेखील छान आहे.
या कथेची आणिक एक आवृत्ती मी वाचली. त्या कथेत त्या माणसाची बायकोच नदीत पडते ! पोहता येत नसल्याने तो माणूस जलदेवीची आळवणी करतो आणि माझी बायको मला परत मिळवून दे विनवतो. नेहमी चाचणी घेण्याची हुक्की येणारी जलदेवी त्या माणसाच्या आळवणीवर प्रसन्न होऊन त्याच्या बायकोच्या जागी एक अप्रतिम सुंदर अशी अप्सरा घेऊन पाण्यातून बाहेर येते आणि विचारते,"ही आहे का तुझी बायको?" आवंढा गिळून तो माणूस म्हणतो,"अं?! हो.." त्या माणसाच्या खोटेपणावर जलदेवीला त्याचा अत्यंत राग येतो. ती त्याला भलंबुरं बोलून खोटे बोलण्यामागील कारण काय असे विचारते तेव्हा तो माणूस म्हणतो,"मला फक्त माझी बायकोच हवी आहे. तिच्यासोबत मला तुम्ही आणखीन अनुपम सुंदर अशा दोन रुपवती दिल्यास त्यांचा मेहुण्या म्हणून देखील संभाळ करणे मला शक्य नाही. चार जीव धोक्यात घालण्याऐवजी एक जीव कायमचा हरपल्याच्या दु:खात दुसरा जीव होरपळला तरी चालेल." त्याच्या या उत्तरावर जलदेवी अंतर्मुख झाली आणि चाचणी करण्याची पद्धत अपग्रेड करायला हवी असे पुटपुटत अप्सरेसोबत पाण्यात जाऊन त्या माणसाच्या बायकोला घेऊन वर आली. त्या माणसाला त्याची बायको सोपवून 'नांदा सौख्यभरे' आशीर्वाद देऊन जलदेवी परत गुप्त झाली.