गऱ्यांचे फेकून देणे प्रतिकात्मक आहे. महत्त्व गरे खाण्याला आहे की फणस सोलण्याला? 'तुम्हाला धड फणस सोलता येत नाही, मग तुम्ही गरे कसले खाताय?' अशा वृत्तीचा दांभिक वृत्तीचा बुरखा फाडणे हा या चर्चेचा हेतू आहे. 'मला फणस सोलता येतो, म्हणून मी कापा फणस चांगला असे म्हणालो, तर कापा, मी बरका असं म्हणालो, तर बरका...' हा अहंगंडही बरा नव्हे. ज्याला फणस सोलताही येतो, गरे खाताही येतात आणि फणस न सोलता येणाऱ्यांविषयी ज्याच्या मनात तुच्छताही नाही, ते तर सदैव आदरणीयच रहातील. फणसाचे गरे खायला तर आवडतात, पण फणस सोलणे काही जमत नाही, अशांनी गरे खाऊच नयेत की काय? किंवा गऱ्याच्या गोडीविषयी त्यांनी काही बोलूच नये काय? 'सोलणाऱ्याने सोलत रहावे, खाणाऱ्याने खात रहावे' असा सुवर्णमध्य खाण्यापेक्षा सोलण्यातच धन्यता मानणाऱ्यांना जमत नाही म्हणून तर हा चर्चाप्रपंच.
'रसभंग, क्षमस्व...' वगैरे कृपया म्हणू नका. विचार तर्काच्या सहाणीवर घासले गेले तरच त्यातले खरे काय, खोटे काय हे कळेल. नाहीतर मला वाटते तेच खरे असा भाव वाढीला लागेल. तसे होऊ नये हेच तर या चर्चेचे प्रयोजन आहे!