कचेरीत संध्याकाळचे ६:३० वाजलेले असतात. कुटुंबवत्सल सहकारी घरी गेलेले असतात. २ तासांची जर्मनभाषा शिकवणी शिकून बौद्धिक थकवा आलेला असतो.. कचेरीत परत येउन परत संगणक सुरु करायचा. मग तो सुरु होईपर्यंत जरा इकडेतिकडे भटकायचे.सोबतीला फक्त निरव शांतता आणि संगणक..

सकाळी आणलेला डबा(खिचडी/पाव लोणी/४ उकडलेले बटाटे मीठ घालून) केव्हाच संपला. पोटात कावळे ओरडत आहेत. कॉफी मेजावर सकाळी ३-४ फळे ठेवलेली असतात. बघू एखादे आंबट संत्रे उरले आहे का.. कॉफी मेजापाशी यावे तर ते शेवटचे संत्रे/सफरचंद यांत्रिक झाडू मारायला आलेली बाई 'नाहीतरी कचर्‍यातच जाणार आहे. खाऊन टाकावे.' या उदात्त भावनेने खात असते. अनु तिला हसून 'गुटन टाग' करते.कॉफीयंत्रातून हलाहलासम कडवट जर्मन कॉफी ओतून घेते.(नुसतेच कॉफी मेजापाशी जाऊन परत फिरलेले वाईट दिसते ना, म्हणून हो!)आणि पोटातल्या कावळ्यांना घेऊन परत आपल्या संगणकापाशी येते.       

सोबतीला काम,कावळे आणि मनोगत. मग डोळ्यासमोर चमचमीत थालिपीठ, रगडा पॅटीस, शेवपुरीबटाटादही इ.इ. दिसायाला लागते. अनु जांभया देत उरलेले काम करते. आणि खिचडीचे दाबपाचक पात्र लावून खाऊन एकदाचे पोटातल्या कावळ्यांना शांत करण्यासाठी घरी जाते..पण १५ दिवसांनी अनु पुण्यात असेल. आणि हे पदार्थ ती प्रत्यक्ष करत/खात असेल. या कल्पनेने तिची पावले भराभर तिच्या ब्रह्मचार्‍याच्या मठीकडे चालू लागतात..