आत्तापर्यंत दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
वरील वर्णन केलेला प्रसंग हा माझ्या मते गांधीजींचे माणूसपण दाखवतो. त्यांच्या आणि लॉर्ड आयर्विन यांच्या संवादांमधून दोघेही विचारांचे पक्के असल्याने एकमेकांशी कसे चतुरपणे संभाषण करीत प्रसंगातून स्वतःला हव्या त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करीत होते असे मला वाटते. आयर्विन हे देखील गोड बोलत स्वत:चे कार्य साधायचा प्रयत्न करीत होते. (उद्योग मिळवताना/कामे करून घेताना व्यापारी लोक ज्याप्रकारे बोलतात, त्याचाच हा एक नमुना वाटला - गांधींनी देखील हे ओळखले असणार - पण सवय असल्याने त्याला वारेमाप महत्त्व दिले असेल असे वाटत नाही).
यावर माझे एक निरिक्षण असे आहे की लॉर्ड आयर्विन यांनी त्यांना त्याच वेळी भगतसिंग यांची फाशी लांबणीवर टाकता येणार नाही याची कल्पना दिली होती (जी गांधीजींच्या बिर्लांशी संवादात नाही, पण आयर्विन यांच्या अहवालामध्ये त्यांनी १, २ आणि ३ अश्या मुद्द्यांतून लिहून ठेवली आहे). हा भाग गांधीजींच्या बिर्लांशी केलेल्या संवादात का नाही, हे माहित नाही, पण कदाचित त्यांना एकदम सर्वांची निराशा करणे उचित वाटले नसावे. पण लॉर्ड आयर्विन यांच्या विचारांवर याचा नक्की परिणाम झाला - ते अस्वस्थ झाले. त्याचा वापर करून गांधींनी त्यांना २३ तारखेला पत्र लिहिले. त्यातही त्यांनी निर्णय हा आयर्विन यांच्यावरच सोपवला.
माझ्या मते दोघांच्याही नजरेतून इतर कशापेक्षाही ठराव (सेटलमेंट) महत्त्वाची होता. गांधींनी तरीदेखील भगतसिंगांचा उल्लेख केला. ते तो टाळू शकले असते. पण तरीही त्यांनी लोकांच्या (आणि कदाचित काँग्रेसमधील तरूणांच्या) इच्छेला मान देऊन तो विषय काढला (त्याआधी भगतसिंगाचे चारित्र्य वगैरेची शहानिशा त्यांनी त्यांच्या मार्गांनी करून घेतली होती, हे त्यांच्या इतर लेखनावरून कळते). भगतसिंगांच्या सुटकेचा त्यांनी ठरावाप्रमाणे (इतका) पाठपुरावा मात्र केला नाही. हे त्यांच्या तत्त्वाला आणि राजकारणाला धरूनच होते. पण त्यात जाणून बुजून दुष्टावा केल्यासारखे प्रतिबिंबित होत नाही. त्यांनी भगतसिंगांना सोडून द्या हे अधिक कणखरपणे म्हटले असते तर काय झाले असते हे विचार करण्यासारखे आहे. त्याने भारताच्या इतिहासात नक्की काय (चांगला/ वाईट) परिणाम झाला असता कोणास माहित? पण माझे मत असे झाले आहे, की त्याजागी भगतसिंग काय त्यांचा स्वत:चा मुलगा असता तरी त्यांनी यापैकी काही केले नसते.
पण म्हणून गांधीजींनी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम जो काय बरा वाईट व्हायचा तो भारतावर आणि भारतीयांच्या मानसिकतेवर झालाच. हे निर्णय घेताना त्यांनी जी प्रक्रिया वापरली ती त्यांच्या मते त्यांनी नीट उघड करून सांगितली. पण सर्वांना त्या निर्णयात सामील करून घेण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून कमी पडले किंवा त्यांनी ते निर्णय वडिलधारी माणसे घरासाठी जशी घेतात तसे घेतले असे मला वाटते. ती पद्धत सदैव बरोबर नसते, पण म्हणून त्यावर टीका व्हावी. गांधीजींनी भगतसिंगांना पाण्यात पाहून त्यांचा काटा काढला अश्या प्रकारे शंका घेण्याइतका पुरावा नाही असे वाटते.