आमच्या कामवाल्या बाईला तिचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळविण्यासाठी लाच द्यावी लागते. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांना मोफत सेवा देण्याऐवजी गरीब रुग्णांकडून पैसे घेण्याचे आदेश येतात. या व अशा मलिद्यातला मोठा वाटा त्या-त्या खात्याच्या मंत्र्यांना जातो. जो अधिकारी/कर्मचारी असली हीन कृत्ये करण्यास नकार देतो त्याचे जगणे असह्य होते. याचा थेट परिणाम गरीब सामान्य जनतेवर होतो. म्हणून त्या प्रत्येकाने राजकारणात जावे काय? हे शक्य आहे काय? कित्त्येक सरकारी खात्यांमधल्या नोकऱ्या राजकीय दबावाखाली कुवत नसलेल्या लोकांना खिरापतीसारख्या वाटल्या जातात. ज्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा वशिला नाही, ते नोकऱ्यांपसून वंचित राहतात. त्यांच्या हुशारीची किंमत मातीमोल होते. म्हणून त्या सगळ्यांनी राजकारणात जावे काय? हे व्यावहारीक आहे काय? सामान्य माणूस राजकारणात जाण्याचा विचार करत नाही कारण राजकारणात अतिआवश्यक असलेला निलाजरेपणा, बदमाषपणा त्याचात नसतो. अर्थातच, भीती हे देखील त्यामागचे कारण असतेच. शिवाय राजकारण करणे हा प्रत्येकाचाच पिंड असतो असे नाही. साध्या-सरळ मार्गाने जाणाऱ्या सामान्य माणसाला नेहमीच राजकारणाला दूर ठेवणे जास्त सुरक्षित वाटत आले आहे. पण म्हणून घाणेरड्या राजकारणावर, स्वार्थी राजकारण्यांवर, त्यापासून होणाऱ्या उपद्रवांवर तिखट प्रतिक्रिया व्यक्तच करायची नाही असे नाही. किंबहुना तो राजकारण्यांवर एक प्रकारचा अंकूश असतो.
मोहोळ सारखे लोकं ज्या क्षेत्रात असतात तेथे शक्यतो सामान्य माणसे जात नाहीत. उगीच असल्या थिल्लर आणि निर्लज्ज लोकांचे उदात्तीकरण होऊ नये हाच प्रयत्न. आपण राजकारणात जाऊ शकत नाही म्हणून यांची वाईट कृत्येही खपवून घ्यायची हा तर मूर्खपणाचा कळस म्हटला पाहिजे, नाही का? तुमच्या व्याख्येनुसार अण्णा हजारे तर मूर्खशिरोमणी ठरतील. जे महान लोकं भ्रष्टाचाराविरुद्ध लढले, लढतात ते ही मूर्खच म्हटले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात जी व्यक्ती कुठल्या तरी, त्याला शक्य असणाऱ्या माध्यमातून या गोष्टींविरुद्ध आवाज उठवते, ती मूर्खच आहे, असे आपणांस म्हणावयाचे आहे काय? तसे असेल तर मग हा एक मोठा विनोद आहे.