ही घटना आहे दि. २४ फेब्रुवारी १६७४ ची (माघ वद्य चतुर्दशी, त्या दिवशी शिवरात्र होती). म्हणजे राज्याभिषेकाच्या केवळ काही महिने अलिकडची.

"हा (बहलोलखान ) घडोघडी येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो, याची गाठ घालून, बुडवून फते करणे. नाही तर (पुन्हा आम्हास) तोंड न दाखविणें." -(संदर्भ: राजाशिवछत्रपति, लेखक : बाबासाहेब पुरंदरे)

हे पत्र हाती पडताच प्रतापराव गुजर बहलोलच्या आठवणीने भयंकर खवळला व अस्वस्थ झाला. त्याला डोळ्यापुढे राजांचा राज्याभिषेक दिसू लागला. मराठ्यांचा राजा सिंहासनावर विराजला की मुजऱ्याचा पहिला मान सरसेनापतींचा! आणि मी मात्र त्यांना तोंड दाखवायचे नाही? तो घायाळ झाला आणि दिवसरात्र बहलोलच्या पाळतीवर राहीला, मात्र बहलोल सापडत नव्हता.

एक दिवस प्रतापराव आपल्या छावणीपासून दूर रानात असताना अचानक बातमी आली की बहलोल नेसरीच्या रोखाने येत आहे. नेसरी हे गाव कोल्हापूर जवळ गडहिंग्लजपासून सात कोसांवर आहे. बहलोल हे नाव ऐकताच प्रतापरावाच्या मस्तकात संतापाचा स्फोट झाला. हाच तो; ज्याला गर्दीस मिळवल्याशिवाय मी माझ्या राजाला मुजरा करू शकत नाही!

प्रतापराव आपली तीस हजार फौज विसरला, आणि तलवार उपसून घोड्यावर स्वार झाला. आपला सरदार निघाला म्हणताच बरोबर असलेले सहा मराठेही मागचा पुढचा विचार न करता त्याच्या मागे निघाले. बेफाम वेगाने फुफाटत ते सात नेसरीच्या खिंडीत खानाच्या प्रचंद सैन्यावर तुटृन पडले व खानाच्या दिशेने सुटले. अखेर सात विरुद्ध हजारो पठाण हा संघर्ष किती वेळ चालणार? काही क्षणातच ते सातही वीर पडले.

पुढे त्यांची जागा आनंद मकाजी याने घेतली व त्याने खानाला हूल देत पळाल्याचा आभास निर्माण करत कर्नाटकात मुसंडी मारली व बहलोलच्या जहागिरीतील पेंच हे ठाणे  लुटुन दोन हजार बैलांवर लूट लादून तो परतला. वाटेत त्याची गाठ बहलोलशी पडली. मात्र त्याला पाहताच 'आपल्या सेनापतीला मारणारा हाच' या अवेशाने मराठे तुटुन पडले व खानाचा धुव्वा उडाला.

पुढे प्रतापरावाची मुलगी महाराजांनी आपल्या घरात करून घेतली. नक्की तपशील आठवत नाही.