नमस्कार,

मला वाटतं की कुणावरही राज्य करण्यासाठी अंगी कर्तृत्व असावं लागतं, केवळ असून भागत नाही तर ते दाखवावंही लागतं.

अहो साध्या शेळ्या मेंढ्यांचा कळप जरी सांभाळायचा असला तरी सुद्धा अंगी मोठा बांबू लीलया पेलण्याचं आणि एवढ्यामोठ्या कळपातून हव्या त्याच शेळीच्या पाठीवर दणका देण्याचं सामर्थ्य पाहिजे. असं असेल तेंव्हाच सर्वात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या शेळ्या आपलं ऐकतात. माणूस तर खूप हुशार आणि ताकदवान आहे म्हणतात. पण माणसात काही दोष सुद्धा आहेत. मी मराठी आहे त्यामुळे मराठी समाजातील हे दोष मला ठाऊक आहेत.

या गुणदोषांना सुखावूनच आणि एकाची ताकद दुसऱ्याला बुडवायला वापरूनच येथे परकीय राज्यकर्ते टिकले. ते येथे आले आणि येथे राज्य केले. हे आपल्याला साहजिक आवडणारे नाही. पण या उप्पर जाऊन एक मान्य करावे लागेल की त्यांचं कर्तृत्व तेवढ्या प्रतीचं होतं की ते हा चमत्कार करू शकले.

कुणीही कुणाचे वर्चस्व सहजासहजी मान्य करीत नाही. त्यासाठी बाहेरून आलेल्यांनी येथल्या समाजाचे निरीक्षण केले, अभ्यास केला. मग साम-दाम-दंड-भेद यापैकी जे मानवेल त्याचा उपयोग करून येथे राज्य केले. मात्र असं करायला  आपल्या लोकांना थांबवले होते कुणी?

खूप आधीपासून ही प्रकिया चालू आहे. ग्रीक हून शकांपासून मोघल ते इंग्रजांपर्यंत. या सर्वांनी येथे येण्याची , येथे राज्य करण्याची हिंमत केली ती याच गुणदोषांची आणि त्यांना सुखावण्याची जी प्रतिभा त्यांच्या अंगी त्याच्याच बळावर.

भारतीय इतिहासात असे कितीसे दाखले आहेत की ज्यात लाखोच्या संखेने बाहेरून आक्रमण झाली आणि तो राजा येथे खूप वर्ष राज्य करू शकला? तर नाही येथे तेच लोक राज्य करू शकले ज्यांत वरील गुण होते. ते मुघल असो वा इंग्रज कुणाकडेच तेंव्हा मोठी सैन्यशक्ती नव्हती जेव्हा त्यांनी भारतात प्रवेश केला होता. पण हे त्यांचं कर्तृत्व होतं आणि आपलं नाकर्तेपण जे आम्ही त्यांची पुजा तेंव्हा दिल्लीश्वरो वा जगदीश्वरोवा अशी करायचो.

माझं बोलून झालं. पण हे सुद्धा लक्षात येतं की ज्या मराठी मानसांत हे कर्तृत्व होतं त्यांनी बाहेर जाऊन आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं दिसून येतं. असं म्हटलं की, आपण तत्काळ धाव घेतो ते सिलिकॉन व्हॅलीत. तेथील भारतीयांचं कर्तृत्व मान्यच पण हे खुप आधी पासून होतंय, जरा मागे जाऊ.  पहिल्या बाजीरावाने पोरासोरांतून उभेकेलेले सरदार घराणे भारतात विविध प्रांतात आपले भक्कम पाय रोवून उभे राहिले. प्रत्येक काळात ते आपलं कर्तृत्व सिद्ध करताहेत. जे करताहेत तेच टिकताहेत. आजची ग्वाल्व्हेरच्या परिसरात शिंदे निर्विवाद राज्य करताहेत. तसेही मालवा, गुजरात, तंजावर आदी भागात खूप मराठी लोक आपल्या कर्तृत्वावर यश संपादन करताहेत.  

मी पुन्हा वरील वाक्य बोलतो राज्य करण्यासाठी अंगी कर्तृत्व लागतं. मग वंश मागे पडतो. प्रांत मागे पडतो.

नीलकांत