माझ्या मते प्रेम ही गोष्टच अशी आहे, की ज्याची दृढ अशी व्याख्या करताच येत नाही. प्रत्येकजण हा त्याला आलेल्या अनुभवांवरुन किंवा त्याने पाहिलेल्या काही उदाहरणांवरुन आपापला दृष्टिकोन वापरुन प्रेमाची व्याख्या करतांना दिसतो. म्हणूनच की काय चित्रपटांतील प्रेमकथांमध्ये आपल्याला बराच वेळा नावीन्य पहायला मिळतं. (आता या प्रेमकथांचे अनुभव नक्की कोणाचे ते कोणाला माहीत?) त्यामुळे सर्वांनाच या द्विधा मन: स्थितीतून जावे लागते कदाचित.
आता प्रश्नांची उत्तरे शोधायची म्हणले, (अर्थातच माझ्या किंवा मी पाहिलेल्या अनुभवांवरुन) पहिल्या नजरेतील प्रेम असू शकते. (पण फार कमी वेळा) बऱ्याच जणांच्या बाबतीत मी हे पाहिलेले आहे. ते नुसते शारीरिक आकर्षणही नसते. कधीकधी समोरच्या माणसाच्या देहबोलीवरुन त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो.(अंदाजच) त्यामुळेच पुढच्या काही गोष्टी शक्य होऊ शकतात. निदान आपल्याला त्या माणसाबरोबर वेळ घालवायला आवडतो किंवा आपण आपली सुख दु:ख त्या माणसाबरोबर वाटू शकतो हा विश्वास दोघांनाही जाणवतो. माझ्या अंदाजाने हीच प्रेमाची व्याख्या असू शकते. (पुन्हा एकदा अंदाज!! आणि तो ही माझा!!)
टीप: वर वापरलेले कंस बऱ्याच जणांना खटकू शकतात, किंवा द्विधेत टाकू शकतात, पण करणार काय?? पुराणकाळापासून कंसाच्या गोष्टी(अडचणी) चालत आल्या आहेत. त्यामुळे माफी असावी.
विशेष:
पण यावर माझ्या एका मित्राने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे तो मी इथे नमूद करु इच्छितो. असे म्हणतात की प्रेम हे काही फक्त बायको अथवा प्रेयसीवरच नसते. ते भाऊ, बहीण, आई, वडील यांच्यावरही असतं. पण वादाचा मुद्दा असा की प्रेयसीला किंवा बायकोला आपण "आय लव्ह यू" अर्थात माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगतो. पण आपल्याला कधी इतरांना असं म्हणावं लागत नाही. मग ते प्रेम नसतं काय? का हे प्रेम नसतं? का हे दोन्ही प्रेम नसतं? नाही तर मग दुसरं काय असतं? हे असे प्रश्न अनुत्तरितच राहतात.
(आता यावर काय बोलणार?? अडचणीत आल्यामुळे कंस वापरावा लागला!!)
कळावे,
लोभ असावा..
आपलाच --- सवित्र.