नमस्कार,

मी अनेक याहू ग्रुपचा सदस्य आहे. अगदी मनोगताचा याहूवर जो कंपूबाजी नावाचा ग्रुप आहे त्याचासुद्धा सदस्य आहे. येथे वर मनोगत असतांना याहू ग्रुपची गरज काय असा विचार मांडण्यात आला आहे.

माझ्या मते अशी तुलना होऊ शकत नाही. याहू ग्रुप चालवायला मला केवळ याहूचे सदस्य असनं गरजेचं आहे, आणि भरपुर वेळ असेल तर अगदी चकटफू  असलेली ही सेवा सहज वापरता येते.

मनोगताचं मात्र तसं नाही. ड्रुपल सारख्या मुक्तस्त्रोत प्रणालीवर आधारीत असून सुद्धा मनोगताची काही तंत्र अगदी बिलगेट्स च्या पावलावर पाऊल ठेवतात. म्हणजेच कशाचाही अगदी थांग लागू देत नाहीत.

खरं पाहिलं तर इतक्या दिवस मी मनोगतावर आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून ड्रुपल बद्दल वाचतो आहे. यासर्वांतून मला मात्र मनोगताबद्दल कौतुक वाढतच आहे. ड्रुपलचा एवढा समर्पक वापर मी अद्याप बघीतला नाही. अद्यावत तंत्रज्ञान असलं म्हणजे ते वापरायला कठीणच असलं पाहिजे या या आपल्या परंपरागत मान्यतेला छेद देनारा मनोगताचा चेहरामोहरा (इंटरफेस) आहे. तो अगदी नविन माणसालासुद्धा सहज आकर्षीत करतो. सरळ मराठीत टंकलेखन सुविधा असनारे हे देवनागरीतील एकमेव संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ सुरवातीपासून मोफत आहे आणि नजिकच्या भविष्यात तरी ते तसेच राहील अशी प्रशासकांनी ग्वाही दिली आहे.

मात्र असं असून सुद्धा मला याहू ग्रुपची गरज वाटते. मनोगतावर इतकं प्रेम करीत असून सुद्धा मला काही प्रश्न पडतात. काल कधीतरी प्रशासक साहेबांचं मत झालं त्यांनी बक्कळ पैसा ओतून हे संकेतस्थळ बनवलं. त्यातून माय मराठीची सेवा करण्याचा त्यांचा मानस. पण दुर्दैवाने उद्या प्रशासकांना वाटलं की मनोगत बंद करावं किंवा त्याची सेवा मुल्यवर्धीत करावी तर? मराठीसाठी  काम करणाऱ्यांनी कुणा एकाच स्त्रोतावर आधारीत राहून चालनार नाही. एक इंग्रजी वाक्य आहे 'शो मस्ट गो ऑन'. हे झालं पाहिजे. वेगवेगळ्या पातळींवर कामं झाली पाहिजेत. माझं मत तर असं आहे की मनोगताच्याच वेगवेगळ्या आवृत्या निघायला हव्यात. पण मनोगताच्या प्रशासकांना आणिकाही मागतांना जीभ अडते. ज्यांना मनोगत बनवायला किती पैसा आणि श्रम लागले असतील याची कल्पना असेल ते माझ्या या वाक्यशी सहमत असतील.

पण माझ्या जिभेचं हे असं अडणं सुद्धा मराठीसाठी चांगलं नाही. मग पर्याय काय ? तर वेगवेगळ्या जागेहूंन वेगवेगळ्या पातळींवर मराठीसाठी काम करणारे लोक तयार व्हायला हवेत. उद्या अचानक काहीतरी आणि काहीजरी घडलं तरी काम बंद होता कामा नये.

मनोगतच नाही अनामिका सारखे ग्रंथालयं सुद्धा मराठीत तयार व्हायला हवेत. आताश्या महाराष्ट्रात ब्रॉडबॅण्ड सेवा स्वस्त व्हायला लागली आहे आणि ती दुरवर पोहोचते आहे. आता तर मराठी साहित्याची देवाण-घेवाण वाढेल. मराठीला गती येईल. तेव्हा या काळात आपण केवळ एकाच संकेतस्थळावर अवलंबून कसं चालेल महाराजा ?

नीलकांत

(आज मनोगताचा शुद्धीचिकित्सक सगळ्याच शब्दांत चुका दाखवतोय. अगदी मी या शब्दात सुद्धा. काय झालंय?)