पुणे सकाळ ता: ९ औक्टोबर २००६:
मुंबई, ता. ९ - आयकर खात्याच्या अधिकाऱ्याला लाच घेताना सीबीआयने अटक केली. त्याच्याकडील संपत्ती पाहून सीबीआय अधिकारीही चकित झाले आहेत. ........
मुंबईत करी रोडवरील "पिरामल चेंबर'मध्ये या अधिकाऱ्याला लाच घेत असतानाच पकडण्यात आले. रमेश नक्षीग्रह असे त्याचे नाव आहे.
संध्याकाळपर्यंत केलेल्या तपासात नक्षीग्रह याने एचडीएफसी बॅंकेच्या मालाड-पूर्व शाखेत १६ लाख रुपये आपल्या खात्यावर जमा असल्याचे सांगितले. त्याच्या घरातही दीड लाखाची रोख रक्कम सापडली. तिथेच सोन्याची १० बिस्किटेही जप्त करण्यात आली. त्यांचे वजन एक किलो आहे. त्याच्याकडे एक "क्वॉलिस' गाडी आहे. यापेक्षाही अधिक मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. त्याचा पगार फक्त २० हजार इतका आहे. त्याने आपल्या गाडीवर ड्रायव्हर ठेवला असून, त्याला तो साडेतीन हजार पगार रुपये पगार देतो.
मालाडला राहणाऱ्या या अधिकाऱ्याकडे "एन' विभागाच्या फाईल तपासणीसाठी येतात. ज्यामध्ये अंधेरीसारखा औद्योगिक आणि आर्थिक विभाग आहे. रमेशने अंधेरीतील एक फाईल मंजूर करून घेण्यासाठी हितेन तलाठी या लेखा अधिकाऱ्याकडे २५ हजारांची लाच मागितली होती. फाईलमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. तरीही त्याने पैशाच्या लोभाने त्यात त्रुटी दाखविल्या आणि हितेनकडे लाच मागितली. दुसऱ्या दिवशी हितेनने याविषयीची तक्रार लाचलुचपत खात्याकडे नोंदवली. हितेनने २५ हजारांपैकी १० हजार देण्याचे कबूल केले होते. त्यानुसार हितेनकडून ही रक्कम सोमवारी सकाळी घेताना त्याला ताब्यात घेण्यात आले. उद्या या अधिकाऱ्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.