महाराष्ट्र टाईम्स १०/१०/२००६:
नवी दिल्ली
भारतीय नौदलासाठी २००० साली इस्त्रायलकडून सात बराक क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा आयात करताना तेव्हाचे संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी दोन कोटींची लाच घेतल्याचा आरोप करून सीबीआयने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. फर्नांडिस यांच्यासह समता पक्षाच्या तत्कालीन अध्यक्ष जया जेटली यांच्यावरही लाचखोरीचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. तत्कालीन नौदलप्रमुख सुशीलकुमार यांच्यावरही गैरव्यवहाराचा आरोप सीबीआयने केला आहे.
फर्नांडिस यांच्या काळातल्या चार संशयास्पद व्यवहारांच्या संदर्भात सीबीआयने राजधानीसह गुरगाव, संगरूर, बंगलोर आणि पुणे-मुंबईत मंगळवारी ५० छापे घातले. ही घरे शस्त्रास्त्र दलाल व संरक्षण अधिकाऱ्यांची होती. सीबीआयने विशेष कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनुसार एक हजार १५० कोटी रुपयांच्या बराक खरेदीत जया जेटली यांनी 'एजंट'चे काम केल्याचा थेट आरोप सीबीआयने केला आहे. समता पक्षाचे खजिनदार आर. के. जैन यांनीही लाखो रुपयांची लाच घेतल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
डीआरडीओने (संरक्षण संशोधन विकास संस्था) 'इस्त्रायल एअरक्राफ्ट इंडस्ट्रीज'कडून घेतलेल्या या यंत्रणेविरुद्ध मत नोंदवले असतानाही अॅडमिरल सुशीलकुमार यांनी पदाचा गैरवापर करून हीच यंत्रणा खरेदी करावी, असे शिफारसपत्र जॉर्ज यांना पाठवल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
२०० भारतीय नौकांवर बराक बसवण्याचा करार २३ ऑक्टोबर २०००ला झाला. 'तहलका' या वेबसाइटने या खरेदीतील घोटाळा 'स्टिंग ऑपरेशन' करून २००१ मध्ये उघडकीस आणला. तेव्हा जॉर्ज यांनी मंत्रिपद, तर जेटली यांनी समता पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मंगळवारी एकीकडे पाच शहरांत छापे सुरू असताना राजधानीत सीबीआयने जॉर्ज यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती दिली.
जॉर्ज यांच्याशिवाय शस्त्रदलाली करणारे अनेक मंत्रिपुत्र, आमदार सीबीआयच्या 'लिस्ट'वर आहेत. यात संगरूरचे काँग्रेस आमदार अरविंद खन्ना, त्यांचे बंधू विपीन व आदित्य, माजी नौदलप्रमुख एस. नंदा यांचे पुत्र सुरेश यांचा समावेश आहे. बराकव्यतिरिक्त हॉवित्झर तोफांसाठी खरेदी केलेला दारुगोळा (१६६.४४ कोटी रुपये) या तोफांचे सुटे भाग, लष्करासाठीचे खास कपडे, अन्य साधनसामुग्री, ऑटोमॅटिक ग्रेनेड लाँचर्स, बुलेटप्रूफ जॅकेट्स, बूट, जनरेटर्स, स्लीपिंग बॅग्ज, रडार यंत्रणा व स्नीपर रायफल खरेदी यातही प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे सीबीआयने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)