एकंदरीतच सध्या शाळेत शिकविले जाणारे विषय किती अवघड आहेत. मी पहिलीत असताना कमल नमन कर , मदन नमन कर सारखी सोपी सोपी वाक्ये होती आता पहिलीला किती अवघड शब्द आणि वाक्ये आहेत.
माझा भाचा इंग्रजी माध्यमात २री मधे शिकतो. त्याला आत्ता संस्कृत आहे. ज्या मुलांना मराठी आणि इंग्रजीच्या व्याकरणाचाही गंध नाही त्यांना संस्कृतचे अवघड व्याकरण कसे समजणार. लिंगवचनाप्रमाणे कशी वाक्ये तयार करणार ? त्याला गणितामधे २ अंकी संख्यांची वजाबाकी, बोटे मोजून करायची आहे. थोडक्यात ३५-१२ हे गणित त्याने १२ च्या पुढे ३५ येईपर्यंत बोटे मोजून करायचे आहे. आपण २३ बोटे मोजली हे ७-८ वर्षाच्या मुलाच्या लक्षात रहावे अशी अपेक्षा शिक्षक आणि शिक्षण मंडळ कसे करू शकतात !!!
दुसरा भाचा ४थी मराठी माध्यमात शिकतो. त्याला इंग्रजी मधे इतके अवघड शब्द आहेत. त्या मुलांना उच्चाराप्रमाणे स्पेलिंग कसे करायचे हे शाळेत शिकविले नाही. त्यातून जे मुळातच हुशार आहेत किंवा ज्यांच्या आई-वडिलांना इंग्रजी येते त्यांचे ठीक आहे पण ज्यांच्या आई-वडिलांना इंग्रजीचा काहीही गंध नाही, ज्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही अशा मुलांनी काय करावे ?
शिक्षण मंडळ मुलांच्या वयाचा विचार करून अभ्यास का नाही ठेवत ? पालकवर्ग या असल्या अवघड अभ्यासाचा विरोध का करीत नाहीत ?
असा अभ्यास असल्यावर मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत असतील त्यात नवल काय ?