सुखदा,

अभ्यासातही खेळ शोधण्यासाठी तर आपण असतो ! आपण ह्या धिटुकल्यांपेक्षा मोठे.. मग आपल्याला त्यांच्यावर कडी करायला जमणे ते काय अवघड?

"याचं स्पेलींग काय असेल बरं? अम्म... छ्या ! आठवतंच नाही बुवा. आता मी काय करू?" असं म्हणून बघा. जी व्यक्ती आपल्याला शिकवते त्याच व्यक्तीला एखादी गोष्ट जमत नाही म्हटलं की मदतीला धावून जायला खूप आवडतं लहान मुलांना. मग दोघं मिळून ठरवा त्या शब्दाचं स्पेलींग !

मुद्दामहून चुकीचं स्पेलींग सांगा. तुमचं चुकलंय हे सांगायला त्यांना खूप आवडेल आणि "अरेच्चा ! होऽ की.. माझ्या लक्षातच नव्हतं आलं हे तर. तू किती हुशार आहेस रे बबडू.." असं म्हणून खुल्या दिलानं तुम्ही तुमची चूक मान्य करून त्या/तिला शाबासकी द्या. मग स्वतःची चूक झाली की मनमोकळेपणाने तुमच्याकडे ती कबूल करायला त्या कोवळ्या मनालाही काही वेगळं वाटणार नाही.

स्पेलींगच्या भेंड्या खेळा. एखाद्या अक्षरापासून त्या/तिला शब्द आठवत नसल्यास खाणाखुणांनी एखादा शब्द सुचवायचा प्रयत्न करा किंवा खाणाखुणांनी त्या शब्दाचं स्पेलींग सांगायचा प्रयत्न करून त्या/तिला ते अक्षर ओळखायला सांगा. एखादवेळेस तुम्ही मुद्दामहून पडतं घ्या. त्या/तिला तुम्हाला चिडवण्यातला आनंद उपभोगू द्या. मग हलकेच "अर्रे.. आठवलं.. आठवलं.." करत एखादा त्या/तिला माहिती असलेला शब्द सांगा, पण स्पेलींग चुकीचं सांगा जेणेकरून "चुकलं.. चुकलं.. भेंडीऽऽ" असं करून त्या/तिला जग जिंकल्याचा आनंद होईल. "बरोबर स्पेलींग काय आहे मग?" असं लटक्या रागाने विचारून बरोबर स्पेलींग काढून घ्या. खरंच असं जेव्हा ती चिमुकली जिंकतात आणि सर्वांना सांगतात की मी आईला हरवलं.. किंवा बाबांना हरवलं.. आत्याला हरवलं.. तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि दुप्पट उत्साहाने पुढच्यावेळेस अशा स्पर्धेत उतरायला ती तयार होतात.

खेळाच्या युक्त्या या ज्या मुलाला शिकवायचं आहे त्याच्या स्वभावावर, आवडीनिवडींवर अवलंबून बदलायच्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळेच खेळ अभ्यासाशीच संबंधित खेळायचे नाहीत किंवा त्यांना कळायला नको की ते अभ्यासाशी संबंधित आहेत असं. हे लोकं माझ्याशी फक्त अभ्यासाचेच खेळ खेळतात अशी भावना त्यांच्या मनात यायला नको. फक्त मनोरंजनासाठी खेळसुद्धा तुम्ही खेळा त्यांच्याशी ..मग ते 'घोडाघोडा' असू दे किंवा लपाछपी .. आंधळीकोशिंबीर असू दे.. असे खेळ ते त्यांच्या दोस्तांमध्ये तर खेळतीलच पण तुमच्याशी खेळल्याने तुम्हीही त्यांचे दोस्त बनाल आणि यासारखं दुसरं सौख्य कशात नाही !