इंग्रजी चे उदाहरण मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील इंग्रजी विषयाबद्दल होते. मुळात पालकांना येते की नाही हा भाग वेगळा कित्येक मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांनाच इंग्रजी येत नसते. शिक्षकांना ट्रेनिंग देऊन मग शाळेत इंग्रजी शिकविले जाते. पण मुळातच इंग्रजीची सवय नसल्याने शिक्षकांनाही शिकविणे अवघड जाते. इंग्रजीत स्वतःची स्वतः पाच वाक्ये बोलू न शकणाऱ्या शिक्षकांकडून मुलांना इंग्रजी शिकविण्याची जबाबदारी असते. यात दोष शिक्षकांचा नाही कारण इंग्रजी विषय येत नसताना आज ट्रेनिंग दिल्यावर लगेच उद्या फाडफाड बोलता येणार नाही.

कुठलीही गोष्ट शिकणे ही लहान मुलांच्या बाजूने बघायला गेलं तर 'बाये हाथ का खेल' असते.. फक्त मोठी माणसं किती छान पद्धतीने ती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात यात सगळी गोम असते !

अर्थातच जोपर्यंत ती त्यांच्या कुवतीत बसणारी असते.

आपल्याला जी गोष्ट अवघड वाटते, ती गोष्ट समजवून सांगणे आपल्याला आणखीन अवघड असते त्यामुळेच तेच त्यांच्यासाठीही अवघड असल्याचं सांगून आपण 'अवघड अभ्यासाचा विरोध' करायला जातो !

'अ' तुकडीतील हुशार विद्यार्थ्यांचा विचार केला तर असे वाटणे साहजिक आहे. कारण अशा मुलांची आकलनशक्ती सर्वसाधारणपणे सामान्य मुलांपेक्षा जास्त असते. (इथे 'अ' हे उदाहरणादाखल आहे. 'ग' तुकडीतही कोणी असामान्य मूल असू शकते) पण अशी मुले ५० आणि साधारण किंवा कमी बुद्धिमत्तेची मुले ४०० असतात. सध्याची प्राथमिक शाळेतील पुस्तके उघडून पाहिली तर धक्का बसेल. आपण शिकलेल्या बालभारतीमधील धडे, कविता आणि आत्ताच्या बालभारतीमधेल धडे आणि कविता पाहिल्यास ७-८ वर्ष वयाच्या सर्वसामान्य बुद्धीच्या मुलांच्या मानाने ती भाषा किती अवघड आणि किचकट आहे हे लक्षात येईल.  आपण शिक्षित आहोत म्हणून सोडून द्या. पण धुणे-भांडी करणाऱ्या अशिक्षित बाईसाठी या सगळ्या गोष्टी निश्चितच अवघड आहेत.

माझ्या पाहण्यात अनेक मुले आहेत की ज्यांचे आई-वडील अशिक्षित आहेत. त्या मुलांचे इंग्रजी शिकतानाचे हाल आणि पालकांचेही हाल डोळ्यासमोर आहेत.  

ज्यांच्या आईवडीलांना इंग्रजीचा गंध नाही, अशा मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश मिळतो का? आमच्याकडे सगळेचजणं मराठी माध्यमात शिकलो/शिकत असलेलो असल्याने मला याबद्दल काही माहिती नाही, पण बऱ्याच जणांना म्हणताना ऐकलं आहे की प्रवेश प्रक्रियेत पालकांच्या इंटरव्ह्यूचाही काहितरी भाग असतो वगैरे.

माझ्या पाहण्यात असेही काही लोक आहेत ज्यांना इंग्रजी येत नसतानाही त्यांची मुले कॉन्वेंट मधे शिकत होती. अर्थात ही गोष्ट ७-८ वर्षांपूर्वीची असल्याने सध्या नियम बदलले असल्यास कल्पना नाही.

आणि दुसरा मुद्दा असा की मराठी माध्यमात शिकलेल्या सर्वांनाच इंग्रजी चांगले येते असे नाही. आत्ताची पिढी इंग्रजी मधे शिकते, त्यांचे आईवडील सर्वसामान्यपणे मराठीतच शिकलेले असतात. त्यांना जरी शाळेत 'इंग्रजी' शिकविले गेले असते तरी त्यांची इतकी कुवत नसते की ते मुलांचा सगळा अभ्यास इंग्रजीतून घेऊ शकतील. 

तसेच उदा. दाखल म्हणायचे झाले तरी आपण गणिते सोडविताना शिकलेल्या पद्धती आणि आताच्या पद्धतींमधे काही अंशी फरक आहे. त्या पद्धतीच मुळात न समजणारे अनेक पालक आहेत.

आणि स्कॉलरशिपच्या शिकवण्या घेतल्या असल्याने

मला वाटते स्कॉलरशिपला बसवितानाही मुलाच्या हुशारीकडे बघितले जाते. इथे सामान्य मुलांना वाव नसतो.

माझी अगदी जवळची व्यक्ती शिक्षक असल्याने, त्या व्यक्तीकडून मला असे समजते की 'अ' तुकडीतल्या मुलांना शिकविणे आणि 'ड' तुकडीतल्या मुलांना शिकविणे सारखे नसते. 'अ' तुकडीतली मुले भराभरा शिकत जातात त्यांच्या बुद्धीला खाद्यही बरेच द्यावे लागते. आजकाल तर मुले माहितीजालाचा वापर करून शिक्षकांना हैराण करत असतात. पण तेच 'ड' तुकडीतल्या मुलाची प्रगती मुंगीच्या गतीने होत असते.

माझ्या प्रतिसादातील अवघड अभ्यास हे सर्वसामान्य बुद्धीच्या मुलांच्या दृष्टीकोनातून होते. त्यामुळे शिकविणारा कितीही चांगला असला तरी शिकणाऱ्याची कुवतच नसल्याने असे प्रश्न निर्माण होतात. आणि दुर्दैवाने उपजतच हुशार मुलांची संख्या आणि सामान्य बुद्धीमतेच्या मुलांची संख्या यात भरपूर फरक दिसून येतो.