सुखदा,

तुम्ही अनुभवलेली शैक्षणिक परिस्थिती योग्य शब्दात सांगून इतका छान प्रतिप्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही नमूद केलेल्या काही मुद्द्यांबद्दल लिहावेसे वाटले.. 

कित्येक मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांनाच इंग्रजी येत नसते

अशी परिस्थिती असल्यास चूक ना पाल्यांची आहे ना पालकांची.. ती मग त्या संबंधित शाळेच्या कार्यकारिणीवर जे लोकं आहेत त्यांची आहे. त्यांची कान-उघाडणी होणे आवश्यक आहे असे वाटते.

अर्थातच जोपर्यंत ती त्यांच्या कुवतीत बसणारी असते.

हे विधान काहीसे बरोबर असले तरी पूर्णतया नाही असे वाटते. 'कुवत' ही केवळ प्राप्त जेनेटीक्सवर अवलंबून नसून ती नंतरच्या संस्कारांवर देखिल तितकीच अवलंबून असते असे वाटते. कुठले बीज जात्याच इतके परिपुर्ण असते की थोडीशी योग्य परिस्थिती मिळता छान बाळसे धरते परंतु कुठले सामान्य बीजदेखिल सुंदर परिस्थिती प्राप्त करून दिली जाता बऱ्यापैकी बाळसे धरून उत्कृष्ट मार्गक्रमणा करू शकते. एक विशिष्ट वय आल्यावर आपण काहीसे अंदाज बांधू शकतो त्या व्यक्तीच्या 'कुवती'बद्दल.. पण आयुष्यात पहिली पावले टाकायला शिकू पहात असलेल्या प्राथमिक शिक्षण मिळवणाऱ्या मुलांची 'कुवत' ठरवायचा प्रयत्न करणे योग्य नाही असे वाटते.

माझ्या पाहण्यात अनेक मुले आहेत की ज्यांचे आई-वडील अशिक्षित आहेत. त्या मुलांचे इंग्रजी शिकतानाचे हाल आणि पालकांचेही हाल डोळ्यासमोर आहेत.

तुम्ही म्हणताहात तो मुद्दा खरंच इतका गंभीर असल्यास अशा परिस्थितीत त्या मुलांच्या आसपासच्या सुशिक्षित मंडळींनी पुढे येऊन त्या मुलांना मदत करायला हवी.

मला वाटते स्कॉलरशिपला बसवितानाही मुलाच्या हुशारीकडे बघितले जाते. इथे सामान्य मुलांना वाव नसतो.

पालकांनी मागणी केल्यास सामान्य मुलांनादेखिल शाळेने या परीक्षांना बसू देऊन प्रशिक्षण द्यायला हवे. तसे होत नसल्यास रीतसर तक्रार नोंदवली जाऊ शकते. कूट प्रश्न, गणिते, बौद्धिक कसरतीचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच्या प्रकारांपेक्षा हटके विचार कसा केला जावा याबाबत स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रम शिकवताना खूप सुंदर पद्धतीने समजवून दिले जाऊ शकतात. स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम अत्यंत सुंदर आहे आणि मुलांच्या विचारक्षमतेला जबरदस्त चालना देणारा आहे. सामान्य मुलाची देखिल अचंबित करवणारी प्रगती होऊ शकते हे माझे अनुभवांती बनलेले मत आहे.

'ड' तुकडीतल्या मुलाची प्रगती मुंगीच्या गतीने होत असते.

तुम्हाला रुढार्थाने प्रगती ( म्हणजे शालेय शिक्षणातली ) म्हणायचे असावे, कारण सामान्यतः बघायला जाता हीच मुले खेळात, चित्रकलेत, नृत्यकलेत वगैरे छान पुढे जातात/जाऊ शकतात. त्यांचे हे गुण समजून घेऊन त्यात प्रोत्साहन देतानाच शालेय अभ्यासाचे महत्त्वही कसे महत्त्वपूर्ण आहे हे समजवून देऊन त्यांच्या कलाने घेऊन शिकवणारे कोणी त्यांना भेटल्यास ते निश्चितच छान कामगिरी करून दाखवू शकतात. त्यांच्या याच विशेष गरजेला नजरेत ठेवून अस्तित्वात आणली गेलेली 'अ','ब','क' वगैरे तुकड्या पाडण्याची धारणा धाब्यावर बसवून 'अ'तुकडीतले हुशार.. 'ब' तुकडीतले सो..सो.. असे सर्वसामान्यपणे सगळीचकडे सर्व स्तरांवर बोलून त्यांना वेगळी आणि नकारात्मक वागणूक दिली जाते. सो कॉल्ड 'ब' तुकडीतील मुलांना शैक्षणिक प्रगतीसाठी सकारात्मक प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा करणे म्हणजे तर मग घोड्याला शिंग शोधण्याचाच प्रकार म्हणावा लागेल !