नमस्कार,

अमरावतीला असताना विद्रोही साहित्याशी ओळख झाली. आंबेडकरी विचाराचे लेखक जे ही प्रस्थापित समाज व्यवस्था नाकारतात, दुटप्पी नीतिमूल्ये अमान्य करतात आणि नवी समतामुलक समाजव्यवस्था स्थापन करू इच्छितात , असे साहित्यिक स्वतःला विद्रोही म्हणवून घेतात. आपल्या परखड लिखाणाने कुणाची इतराजी होऊन आपलं काही बरं वाईट होईल याची त्यांना तमा नसते. या सामाजिक व्यवस्थेविरुद्ध त्यांनी बंड केले आहे म्हणून 'ते' विद्रोही.

त्यांच्या लिखाणात बरेचदा साहित्यिक संकेत पाळले जात नाही. कधी कधी खूप शिव्या शाप असतात, बरेचदा भावना भडकवणारे लिखाण सुद्धा असते. पण या सर्वांचा आणि मुळातच आंबेडकरी साहित्याचा पाया म्हणजे शोषितांच्या वेदना आहेत.

दबलेल्या, पिळवणूक झालेल्या लोकांचा वेदनाविष्कार म्हणजे आंबेडकरी साहित्य आहे. या साहित्याचा जसा एक प्रमुख हेतू वेदनाविष्कार आहे तसाच एक हेतू समाजात आत्मविश्वास जागवणे हा आहे. त्यामुळे विद्रोही लिखाण हे भडक आहे. मात्र ते केवळ काल्पनिक आहे असं मुळीच नाही. त्याला वास्तवाचा खूप आधार आहे. कित्येक आंबेडकरी लेखकांची लिखाणाची प्रेरणा म्हणजे त्यांचे स्वतःचे आयुष्य आहे.

मी सुचवतो की 'उचल्या' , 'कोल्हाट्याचं पोर' , आदी वाचून पाहा म्हणजे या लोकांनी काय सोसलंय ते लक्षात येईल.

केवळ एकाच समाजाला लक्ष केलं जातं अशी जी वर तक्रार आहे , ती जर मी करायला गेलो तर सहज हिंदू म्हणून माझं  माझ्या धर्म ग्रंथाकडे लक्ष जातं. आणि त्यात एका विशिष्ट गटाबद्दल वारंवार केल्या गेलेलं लिखाण समोर येतं आणि माझी मान खाली जाते. रामायण असो वा महाभारत किंवा गरुडपुराण या सर्वांत असं काहीसं लिखाण आहेच.

दोन्ही जागेवर शिव्याच मग फरक काय? माझ्यामते एका जागेवर शिव्या दिल्या गेल्या त्या एका दुसऱ्या वर्गाला कमीपणा देण्यासाठी  आणि आता शिव्या दिल्या जात आहेत त्या आपल्या दबलेल्या लोकांच्या मनात आत्मविश्वास जागवण्यासाठी. मग माझा या विद्रोही साहित्याला असलेला विरोध गळून पडतो.

मी या शिव्याशापांचा समर्थक नाही, पण त्या साहित्याला विरोधसुद्धा करवत नाही. आत्मविश्वास जागवण्याचं काम चालत राहिलं पाहिजे असं माझं मत. पण त्या स्वरूप आणखी जास्त विधायक व्हावं ही आजच्या मंगल दिवसाला अपेक्षा.

भवतु सब्ब मंगलं !

नीलकांत