मृदुला आणि महेशराव,

फार चांगले मुद्दे पुढे आणले आहेत तुम्ही दोघांनी. त्याबद्दल मला काय वाटतं ते सांगतो

मृदुला, तुम्ही म्हणत आहात ते खरं आहे. पैशाला / पैसे कमावण्याला (विषेशतः धंदा करून) आपल्या समाजात फारशी प्रतिष्ठा नाही. धंदा करणार्‍या आणि त्यायोगे लक्ष्मीची आराधना करणार्‍या व्यक्ती / संस्थेबद्दल आपल्याला साधारणपणे असे उद्गार ऐकू येतात:

- हे काय, इथे लुटायलाच बसले आहेत, (चार आण्याची वस्तू आठ आण्याला विकतात... हरामखोर!)
- हे इतके कसे पैसे मिळवतात, नक्की काहितरी काळाबाजार करत असणार

आणि आपण धंदा न करण्यासाठी अशी काहिशी कारणं ऐकायला मिळतात:

- काय करायचेत एवढे पैसे, सगळं इथेच सोडून जायचं असतं
- कशाला नस्ता व्याप, नोकरीत दोन पैसे कमी मिळतील, पण वेळच्यावेळी हातात येतील.
- आपलं भागतंय ना याच्यात, मग पुरे.

महेशराव,

आपला मुद्दाही रास्त आहे. लक्ष्मी आणि सरस्वती मधे भेद करायला लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं. आपण विद्यार्थीदशेमधे असताना हा भेद करणं आणि फक्त सरस्वतीच्याच आराधनेवर लक्ष केंद्रित करणं हे योग्य असेलही.... पण लौकिकार्थानी विद्यार्जन करून झाल्यावर आणि अर्थार्जन सुरु केल्या नंतरही असा भेद करत रहाणं योग्य आहे का? इथेच आपण चुकतो का?

सरस्वती आणि लक्ष्मी यांची आराधना या, आपण मानतो तशा, परस्परविरोधी गोष्टी आहेत का? दोन्हीची आराधना एकाच वेळी करत रहाणं शक्य नाही का? उलटपक्षी, या दोन्हीची आराधना करणारी आणि दोन्हींचा सुरेख मेळ घालून स्वतःचा उद्योग उभा करणारी व्यक्ती एक अत्यंत संवेदनाशील उद्योजक बनू शकते असं मला वाटतं.

शंतनुराव किर्लोस्करांचं (चु.भु.दे.घे) एक वाक्य कुठेतरी वाचलं होतं:
The day Profit stops being treated as a dirty word, India will prosper

प्रसाद...