भाऊसाहेबांच्या स्वप्नात काय आले बघा -

१. येवूनही येथे आम्हा ना भेटूनी गेलीस तू

ऐकतो स्वप्नात माझ्या येऊनी गेलीस तू

यातही उपकार आम्हा काही कमी ना वाटले

स्वप्नात येशील ऐसे स्वप्नातही नव्हते वाटले

२. भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते

येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते

म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या

सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या

जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी

स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी

भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे

स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे

त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा

नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा

ऐकिले दुसर्‍या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे

बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे

आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले

पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले 

भाऊसाहेबांच्या शायरीचे माझ्याकडील संकलन आता संपले. आता मी इतरांचे वाचेन.

-वरदा