रोहिणी, तुम्ही सांगितलेली कृती छानच आहे.. तरीही काही मुद्दे सांगावेसे वाटतात..
- कोमट पाणी वापरून केलेल्या भाकरीपेक्षा साधे नेहमीच्या तापमानातले पाणी वापरून केलेली भाकरी जास्त चवदार लागते. गव्हाच्या कणकेपेक्षा ज्वारीच्या पीठात इरे ( म्हणजेच लाटलं/थापलं जात असताना तुकडे न पडण्यासाठी आवश्यक गुणधर्म ! ) खूपच कमी असते. कणकेप्रमाणे ज्वारीचे पीठदेखील एकदम सगळे मळून घेतल्यास हे इरे आणखीनच कमी होऊन त्या पीठाचा गोळा घेऊन थापायचा प्रयत्न केल्यास भाकरीला तडे जाऊन ती साधवणे निव्वळ अशक्यप्राय होते. यातून सुटकेचे मार्ग दोनच - एकतर गरम ( कोमट नाही ) पाणी वापरून गोळा मळून ठेवून मग थोडाथोडा गोळा घेऊन परत मळून भाकऱ्या थापणे - जो मार्ग ४-५ भाकरी करण्यापुरता अनुकरणीय असला तरी चळतीने/ जास्त संख्येने भाकऱ्या करायच्या झाल्यास इतकावेळ योग्य त्या तापमानात गरम पाणी उपलब्ध ठेवणे प्रचंड गैरसोयीचे असल्याने अनुकरणीय नाही आणि दुसरा मार्ग म्हणजे प्रत्येक भाकरीसाठी नेहमीच्या पाण्याने वेगळ्याने गोळा मळून घेऊन भाकरी थापणे - जो मार्ग भाकरीला भाजले जायला पोळीच्या तुलनेत लागणाऱ्या जास्तीच्या वेळामुळे योग्यप्रकारे सहजी नियोजला जाऊ शकतो.
भिजवलेल्या पीठाचा हवा तसा एक गोळा एकसारखा करून थोडा चपटा करून घेऊन परसलेल्या पीठावर ठेवून त्यावरून अजून थोडे ज्वारीचे पीठ पसरून घड्याळ ज्याप्रमाणे फिरते त्याच्या विरूद्ध दिशेने थापणे. थापताना अधुन मधुन गोळा घड्याळाच्या दिशेने सरकवणे. याप्रमाणे गोळा मोठा व गोल होतो.
या ऐवजी
- भिजवलेल्या पीठाचा हवा तेवढा गोळा नीट मळून एकसारखा करून परातीत पसरवलेल्या पीठावर ठेवून त्यावरून अजून थोडे ज्वारीचे पीठ पसरून घड्याळाचे काटे फिरतात त्याच्या विरुद्ध दिशेत हलक्या हाताने थापट्या मारत थापणे. थापताना गोळा ९० अंशातून थापला गेल्यावर ९० अंशातून घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेने फिरवून घेणे. ( म्हणजे साधारण तासकाट्याच्या १२ वाजताच्या स्थितीतून ९ वाजेच्या स्थितीपर्यंत हा गोळा थापायचा आणि मग अख्ख्या गोळ्याला ९ वाजेच्या स्थितीतून १२ वाजेच्या स्थितीपर्यंत नेण्यासाठी फिरवायचे ! ) याप्रमाणे थापत-फिरवत गेल्यास गोळा हळूहळू भाकरीचा आकार घेऊ लागतो.
असे म्हणावे का? ( नेहमी अवलंबतो ती कृती अशी शब्दांत कशी व्यक्त करायची ते मला याहून चांगल्याप्रकारे कसं करता येईल ते नाही कळलं त्यामुळे चु.भू.द्या.घ्या.)
- भाकरी ही लोखंडाच्या तव्यावर जास्त छान बनते. असा तवा वजनाने जड असल्याने भाकरी आचेवर टाकायच्या वेळेस तो सांडशीने उचलायचा झाल्यास खूप अवघड जाते. अशावेळेस सरळ आचेवर भाजणे शक्य नसल्यास सुलट्या बाजूकडून भाकरी तव्यावरच टाकून वरून सुती कापडाच्या बोळ्याने ( ईऽऽ करून किंचाळू नका हो 'बोळा' शब्द वाचताच. सुती कापडाची छोटीशी गुंडाळी अशा अर्थाने वापरला आहे मी तो ! :D ) हलकेहलके दाब देत भाकरी तव्यावर घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेत फिरवा. ( याकरता तुम्ही एका बाजूने एका हातातील तवा आणि दुसऱ्या बाजूने दुसऱ्या हातातील कलथा यांचा वापर करू शकता ! आहे की नाही एकदम सोप्पं? :D ) भाकरी फुगेल आणि झकासपैकी भाजलीही जाईल.
- सरळ आचेवर भाजायचे झाल्यासदेखील फुलक्याप्रमाणे भाकरी आचेवर टाकून फुगायची वाट बघत बसू नये. ती आचेवरदेखील घड्याळाचे काटे फिरतात त्यादिशेत फिरवावी म्हणजे सगळ्या कडा नीटपणे भाजल्या जातात. ही गरज फुलक्याच्या वेळेस नसते कारण तो खूप नाजूक असतो.. पटकन भाजला जातो. आपल्याला बनवायचा प्रयत्न करणाऱ्याची पूर्णार्थाने परीक्षा बघितल्याशिवाय भाकरी स्वतःला भाजून घ्यायला कधीच तयार होत नाही ! :D )
गॅसवर केलेल्या भाकरीपेक्षा झकास लागते स्टोव्हवर केलेली भाकरी.. आणि तिच्याहून धासू लागते ती चुलीवर केलेली भाकरी ! चुलीवरच्या भाकरीदा जव्वाब नहीं !