प्रिय शिवश्री गणेश धामोडकर,

शिवाजी महाराज ना "छ्यान्नू" कुळींचे ना "बामनांचे". ते सर्वांचे महाराज होते.  त्यांच्या 'गोब्राह्मणप्रतिपालक'त्वाला मी महत्त्व देत नाही. हे मान्य करून पुढचे बोलतो.

शिखरे यांचा राजकीय हेतूने प्रेरित असलेला इतिहास किंवा पुरंदरेकृत शाहिरी इतिहास म्हणजे खरा इतिहास नाही. इतिहासाचे पुनर्लेखन जरूर व्हावे. नेहमीच व्हायला हवे. पण ते पुनर्लेखन सोयीस्कर नको, खोडसाळ नको. इतिहासाच्या नावाखाली स्तुतिलेखन नको किंवा गरळ ओकणेही नको.

शिवधर्माच्या तत्त्वांत सर्वसमावेशकता असली तरी हा धर्म शिवाजी महाराजांना एक जातीपुरते 'लिमिटेड' करीत आहे, असे मला वाटते. शिवाजी महाराजांवर सर्वच जातीचे लोक मनापासून प्रेम करतात, भक्ती करतात. मग ते 'दादोजी कोंडदेव त्यांचे गुरू आहेत असे कुजबुजणारे असो वा 'दादोजीचा पुतळा हलवा' अशी मागणी करणारे असो.

शिवाजी महाराजांचा धर्म हिंदू आणि जात मराठा नसती तरी फरक पडायला नको. पण शिवधर्मसाहित्य वाचले तर एका विशिष्ट जातिसमूहाच्या लोकांना पेटवण्यासाठी सवंगपणाच केलेला आढळतो. असो.

"सापांची पिल्ले आहेत त्यांना ठेचून काढायला हवे" अश्या प्रकारची भाषा सहिष्णू, समतावादी नक्कीच नाही. मग ती कुठल्या जातीच्या लोकांसाठी असो वा धर्मानुयायांसाठी असो. एखाद्या जातीला आपल्या नव्या धर्मात प्रवेश द्यायचे नाही हे धोरण समतावादी नक्कीच नाही. मक्तेदारांचा नवा वर्ग तयार होतोय एवढेच.

व्यक्तिपूजा करू नये, विभूतिमहात्म्य माजवू नये ह्या मताचा मी आहे. मग ते  प्रकार ब्राह्मणवाद्यांद्वारे झाले असोत वा शिवधर्मीयांद्वारे. ठेचण्याची भाषा करणारे नेते आणि उपलब्ध 'कॅप्टिव' विचारवंत  जे म्हणतात त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या 'लुम्पन' लोकांचे एकवेळ समजू शकतो. पण ज्यांच्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची कुवत आहे त्यांनी ह्या गोष्टींना बळी पडावे! असो.

अश्या प्रवृत्ती ठेचून काढायच्या असतील तर साम्यवादी विचारसरणीला पर्याय नाही.

लाल सलाम!

चित्तरंजन