विद्रोही साहित्य खरे की खोटे हे कोण ठरवणार? मुळात खरं कसं ठरवणार? खरं एकदाचं ठरवूही पण योग्य अयोग्य कसे ठरवणार?  कारण आपले हितसंबंध जपल्या जातात त्याच बाबी योग्य मानायची आपली परंपरा.

आजही कुणी विद्रोही अथवा कुणी आंबेडकरी जेव्हा हिंदू धर्मातील चुकांवर बोट ठेवतो आणि कुणाला उच्चवर्णीय म्हणून त्याच्या विषयी संताप व्यक्त करतो तेंव्हा काय होतं?

प्रतिक्रिया १) आम्ही नाही तसं वागत. उलट आम्ही तर त्यांना आमच्यातील जेवण देतो. (उपकार मायबाप!)

प्रतिक्रिया २) हे सर्वकाही भूतकाळातील आहे. त्यांनी ह्या चुका केल्यात, त्याची शिक्षा आम्हाला का?

- यात कुठेही ते(मागचे) चुकलेत आणि यांनी मागच्या काळात खूप अन्याय सहन केला याची बोच नसते. किमानपक्षी यांनी तरी त्यांना समान मानावं अशी अपेक्षा करावं तर तेही नाही. येथे आम्ही तर त्यांच्याशी 'असं' वागतो. (बघा आम्ही किती मोठ्या(?) मनाचे.) असं बोलल्या जातं.  म्हणजेच आजही समानता मनात नाहीच. दुर्दैव काय की आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊनही ही जात काही सुटत नाही. आपल्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापन करणारे श्री नरेंद्र जाधव यांनाही लोक 'त्या' जातीचा असं म्हणतात. असं खुद्द त्यांचा अनुभव आहे.

प्रतिक्रिया ३) झालं गेलं पार पडलं, आता आम्हाला समानता द्या. गेल्या पन्नास वर्षांत यांनी खूप मलई(?) चापलीय.  आता समानता द्या.

- (पण) यांच्या पूर्वजांनी कमावलेली सर्व जमीन आणि संपत्ती मात्र यांच्या कडेच ठेवा. आजही भारतातील संपत्तीचे वितरण पाहता २० % (तथाकथित) उच्चवर्णीय जातींकडे ८०% संपत्तीचं एकत्रीकरण दिसेल. आजही निम्न वर्गीय जातींचा संघर्ष  किमान जीवनमान दर्जा मिळवण्यासाठीच आहे.  मात्र हे सोयिस्कर रित्या विसरलं जातं.

टीप :- मी दिलेला प्रतिसाद कुणालाही वैयक्तिक पातळीवर कधीच नसतो. वर कुणीतरी असाच वर्तन दाखला दिलाय. तो मी वैयक्तिक न घेता प्रातिनिधिक घेतलेला आहे. कारण मला अशी उत्तरे आधीही मिळालेली आहेत. त्यामुळे स्वतःवर ओढवून घेऊ नये. मला प्रतिसाद सुद्धा माझ्या मुद्द्यांवर आवडेल. अथवा व्य. नि. सोय आहेच.

उच्चवर्णीय म्हणजे ते ज्यांनी (अथवा ते ज्या जातीचा अभिमानाने उल्लेख करतात त्या जातीच्या  पूर्वजांनी) सत्तेचं केंद्रिकरण करून समाजातील बहुसंख्य घटकाला किमान दर्जापासून वंचित ठेवलं असे. यात केवळ एकच जात येते असं माझं मत नाही. इतरही येतात.

* यात विद्रोही साहित्य हा विषय बाजूला पडतोय म्हणून पुन्हा त्या विषयावर येऊ.

विद्रोहींचं आपलं असं तत्त्व आहे. ज्यात फॅन्टसीला थारा नाही. त्यांना तुकारामाचे सदेह वैकुंठ गमन मान्य नाही, कारण हे शक्य नाही. त्यांचा खूनच झालाय हे ते पुराव्यानिशी सिद्ध करतात. त्याला कारण त्यांचं विद्रोही लिखाण हेच आहे. असंही ते मानतात.

प्रस्थापित समाजव्यवस्थेला ज्यांनी तडे देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न या उच्चवर्णीयांनी(तथा.)  नेहमीच केलेला आहे. त्यामुळे आता हा विद्रोही उठाव संघटित आहे. आता सत्य ते सत्य असेल. आणि आमच्या जिवननिष्ठा आता आम्ही ठरवू असा त्यांचा पावित्रा आहे. यातून येणारं हलाहल हा समाजपुरुष पचवेलच मात्र यातून काहीतरी चांगलंही निघावं.

अश्याच प्रवाहातून आलेला एक प्रश्न येथे देतो आहे.

ज्या धर्माचे सर्वोच्च गुरुपद एका विशिष्ट जातीसाठीच गेली हजारो वर्षे राखून ठेवलेले आहे. त्या धर्माला आम्ही आमचा का मानावा?

आमचे(?) धर्मगुरु (शंकराचार्य) कुणा मातंगाच्या हातचं अन्न खातील का?

कुणी खालच्या जातीतील व्यक्ती जर का शंकराचार्य बनण्यास उत्सुक असेल तर त्याला शंकराचार्य होता येईल का?

असे नानाविध प्रश्न त्यांच्या मनात आणि साहित्यात असतात. आता आपल्या समाज व्यवस्थेला. यांची उत्तरे द्यावी लागतील. आता 'सर्वभुतांमधे एकच तत्त्व पाहणारा धर्म' आम्हाला पुस्तकातून केवळ बोलूनच चालणार नाही. तो वर्तनातसुद्धा आणावा लागेल. अन्यथा दरवर्षी अशोकदशमी (आपली विजयादशमी) ला आपल्या धर्माला मोठमोठी खिंडारं पडत राहतील. एक दिवस गड पडेल.

येथे एक छोटीसी कथा सांगून थांबतो.

एका किल्ल्याभोवती वेढा पडलेला असतो. खूप प्रचंड सैन्य आणि दारुगोळा घेऊन शत्रू आलेला असतो. मात्र आपल्या सैनिकांवरील विश्वासाने किल्लेदार मात्र निश्चिंत असतो.

एके दिवशी शत्रूंच्या तोफांच्या माराने किल्ल्याच्या तटबंदीला मोठं भगदाड पडतं. सगळे लोक घाबरतात. चिंताग्रस्त होतात.  किल्लेदार लगेच तेथे जातो आणि सैनिकांसहित ते भगदाड लगेच बुजवतो. मात्र त्याच्या चेहऱ्यावर कसलीच चिंता नसते.

सोबतचे सरदार त्याला विचारतात की महाराज तुम्हाला अजिबात काळजी वाटत नाही? केवढं मोठं भगदाड पडलंय आपल्या तटबंदीला. त्यावर किल्लेदार उत्तर देतो की , " बाहेरून झालेल्या माऱ्याने पडेलंलं भगदाड माझ्या किल्ल्यातच माती पाडेल आणि मी सहज ते बुजवेल. त्यामुळे त्यांच्या(बाहेरच्या) माऱ्याची मला चिंता नाही. मात्र हा ! मला चिंता आहे ती याची की जर आतून कुणाच्या माऱ्याने  भगदाड पडलं तर माती  बाहेर पडेल आणि मग मी ते भगदाड बुजवू शकणार नाही. गड पडेल. "

आतून पडणारी ही खिंडारं जर आपला समाज रोखू शकला नाहीना, तर काळ कठीण आहे.

नीलकांत