पिठलं करतांना पाणी घातल्यावर पिठाचे गोळे होतात. काय उपाय?
पिठलं करण्याचे अनंत प्रकार आहेत, पैकी तुम्ही विचारलेला तो प्रकार कोणता हे कळणे अवघड आहे तरीही मी माझ्या कुवतीप्रमाणे उत्तर द्यायचा प्रयत्न करते.
- फोडणी करून त्यात भिजवलेले पीठ टाकून, शिजवून पिठले करायचे असल्यास -
पाण्यात पीठ नाही तर पीठात पाणी घालावे. तेही एकदम भस्सकन् न टाकता थोडेथोडे टाकून पीठ हलक्या हाताने मळून घेतघेत टाकावे. पीठात आधी थोडेसे पाणी टाकून गोळा मळावा मग आणखीन थोडे पाणी टाकून तो नीट मळत मळत पातळ करावा. मग आणखीन थोडे पाणी टाकून आणखीन पातळ करावा आणि असेच करत जाऊन पिठले कितपत घट्ट/पातळ हवे आहे त्याप्रमाणात पाणी टाकून पीठ भिजवावे. गोळे होणार नाहीत.
- फोडणीत पाणी टाकून त्यात पीठ पेरून पिठले घेरायचे असल्यास -
यामध्ये वरील मुद्द्याच्या विरूद्ध जाऊन आपण पाण्यात पीठ टाकणार असल्याने गोळे होणारच ! डावाने मोडायचा प्रयत्न केला तरी हे गोळे पूर्णतया मोडत नाहीत असा माझातरी अनुभव आहे. अशावेळेस पिठल्यावर थंड पाण्याचा हबका मारून काहीवेळ झाकण ठेवावे म्हणजे वाफेने पिठले शिजते व गोळेदेखील विरघळून मोडतात.
- भाकऱ्या करून झाल्यावर अनायासे तापलेल्याच असलेल्या लोखंडी तव्यावर इन्स्टंट पिठले करायचे असल्यास -
तव्यावर फोडणी करून घेऊन त्यात बेसन टाकून छान भाजून घ्यावे आणि मग पाणी टाकावे. भाजलेल्या पीठाचे गोळे होत नाहीत आणि खमंग पिठले लगोलग तयार होते.
पाणी आणि बेसनाच नक्की प्रमाण काय घ्यावं?
डब्यात नेता येईल असे / भातात ताक घालून तोंडी लावणे म्हणून खाण्यास योग्य असे घट्ट पिठले करायचे असल्यास एक वाटी बेसनाला दिड ते दोन वाटी पाणी घ्यायचे. भाकरीसोबत खाता येईल असेल थोडेसे पातळ पिठले हवे असल्यास एक वाटी बेसनाला तीन वाट्या पाणी घ्यावे. भातात टाकून खाता येईल इतपत पातळ असे पिठले करायचे असल्यास एक वाटी बेसनाला चार वाटी पाणी घ्यायचे.