नमस्कार ,
हा प्रतिसाद जरा गुंतागुंतीचा झालाय. त्यासाठी माहिती देतोय. वर मी लिहिलेला प्रतिसाद विद्रोही साहित्य ला सुखदा ताईंचा प्रतिसाद आलाय. त्याला उत्तर देतोय. माझ्या विद्रोही साहित्यातील उच्चारणाला निळा रंग आहे, ताईंच्या प्रतिसादाला लाल रंग आहे , तर माझ्या उत्तराला काळा. येथे ताईंनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. त्यांनी सोईस्कर रित्या दुर्लक्षिलेल्या शंकराचार्य अथवा हिंदू धर्मातील त्रुटींचा येथे उल्लेख नाही. ते पुन्हा कधीतरी.
प्रत्येक धर्म दुसऱ्या धर्मात कशा चुका आहेत आणि आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे हेच दाखवून देत असतो. त्यामुळे हिंदू धर्मातील चुकांवर कोणी बोट ठेवले तर सर्वसामान्य हिंदूंकडून त्याला विरोध होणे साहजिक आहे. हेच अगदी ख्रिश्चन, इस्लाम इ. धर्मांबाबत लागू होते. पण त्याविषयी मात्र आपल्याला कधीच आक्षेप नसतो. बरं तुम्ही इतका अन्याय सहन केला आहे त्यामुळे अन्याय म्हणजे काय हे तुम्हाला चांगले कळते. मग तीच चूक तुम्ही का करू पाहता आणि पुन्हा त्याचे समर्थन 'इतके वर्ष त्यांनी आमच्यावर अन्याय केला आता आमची पाळी आहे आता आम्ही बघून घेऊ, त्यांना भोगू देत' अशा भाषेने केले जाते ? आंबेडकरांची शिकवण निश्चितच अशी नसावी.
डॉ. बाबासाहेबांना अन्याय मान्यच नव्हता. वर जे उत्तर दिल्या गेलं आहे. ते बौद्ध धर्मीय वेगळे आहेत असं मानून दिलेलं आहे. त्यांचं जाऊ द्यात अनेक विद्रोही हिंदू आहेत. ते सुद्धा असाच प्रश्न विचारतात. त्यांना काय उत्तर द्याल? ते तर घरातले आहेत. अगदी मी सुद्धा हाच प्रश्न विचारतो , मला काय उत्तर द्याल? मला माझा धर्म चिकित्सेची अनुमती देतो. माझ्या धर्मावरील माझे प्रेम मला हा प्रश्न विचारायला भाग पाडतो की 'ह्या' एका गटाच्या हितसंबंधांना जपता यावं म्हणून आणखी किती दिवस माझ्या धर्माला खिंडारं पडणार आहेत?
[आणि कुणाला उच्चवर्णीय म्हणून त्याच्या विषयी संताप व्यक्त करतो तेंव्हा काय होतं?]
याला सारासार विचार न करणे असे म्हणतात. केवळ 'उच्चवर्णीय' म्हणून तो संतापाला पात्र होतो ? तो तुमच्याशी अगदी खरोखरीच्या मित्रत्वाने वागत असतानाही ? अशा वागण्याला विरोध होणारच.
कृपया असा अर्धा उल्लेख करू नये. माझ्या वाक्याचा अर्थच बदलला गेला आहे.
मी असं लिहिलेलं आहे , जे वर आहे सुद्धा.
[विद्रोही साहित्य खरे की खोटे हे कोण ठरवणार? मुळात खरं कसं ठरवणार? खरं एकदाचं ठरवूही पण योग्य अयोग्य कसे ठरवणार? कारण आपले हितसंबंध जपल्या जातात त्याच बाबी योग्य मानायची आपली परंपरा.
आजही कुणी विद्रोही अथवा कुणी आंबेडकरी जेव्हा हिंदू धर्मातील चुकांवर बोट ठेवतो आणि कुणाला उच्चवर्णीय म्हणून त्याच्या विषयी संताप व्यक्त करतो तेंव्हा काय होतं?]
- येथे मला योग्य आणि अयोग्याची आपली व्याख्या द्यायची होती. ती मी दिली. एक लक्षात घ्या कुणी विद्रोही किंवा आंबेडकरी जेव्हा कुणा उच्चवर्णीय जातीला शिव्या देतो तेंव्हा त्या कुणालाही व्यक्तीगत नसतात. खरं तर त्या ब्राम्हणांच्या विरुद्ध नसून ब्राम्हणी मनोवृत्ती विरुद्ध असतात.
आज आमची जी ही हलाखीची परिस्थिती आहे, त्याला ही समाज(धर्म)व्यवस्था आणि त्याचे प्रमुख म्हणून ब्राम्हण हे याला कारणीभूत आहेत असं मानल्या जातं.
सुरवातीच्या संघर्षाच्या काळात जेव्हा विद्रोह कमकुवत होता तेंव्हा तो मोडून काढण्याचा प्रयत्न 'यांनीच' आपलं कर्तव्य या भावनेतून केला. म्हणजेच यांचा आमच्या विकासाला मुळापासून विरोध राहिलेला आहे. अशी सार्वत्रिक भावना आहे.
अनेक वर्षांपासून दबलेल्या आणि वंचना सहन करत जगणाऱ्या समाजाला आपल्या 'स्वतः:च्या' पायावर उभं राहता येतं(!) याचा विश्वास जागा करण्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या अनेक कार्यापैकी एक कार्य म्हणजे उच्चवर्णीय कुणी देवाचे आहे असं नाही तर ते सामान्य मानवच असून आपल्या हितसंबंधाचे वैरी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संघर्ष हा केलाच पाहिजे अशी शिकवणुक दिली. हा संघर्ष त्या काळात तर होताच पण आता सुद्धा आहे.
प्रतिक्रिया १) आम्ही नाही तसं वागत. उलट आम्ही तर त्यांना आमच्यातील जेवण देतो. (उपकार मायबाप!)
यालाच मी दुटप्पी वागणे म्हणते. दिले तरी लाथा आणि न दिले तरी बुक्क्या. या विद्रोह्यांना नेमके काय हवे आहे ? चांगले वागले तरी तुम्ही त्याकडे हिणकस वृत्तीनेच पाहणार असाल तर मग तथाकथित उच्चवर्णीय तुमच्याशी कितीही चांगले वागले तरी तुमच्या विचारात कधीही काहीच सुधारणा होणार नाही. आणि तुम्ही सतत आमच्यावर अन्याय होतो अशा बोंबा मारत राहणार.
- खायचे आणि दाखवायचे यात फरक करता येतो आता आम्हाला. या तथाकथित उच्चवर्णीयांच्या विचारात फरक पडावा म्हणून आमचा लढा आहे. आमच्या विचारात तर त्यांच्या इच्छेविरुद्ध बदल झालेला आहे. माफ करा ! मात्र आम्ही आता स्वतःला मानूस समजतो.
आणि हो आता आमचं बोंबा मारायचं पर्व संपलं. गेल्या काही काळापासून कोण बोंब मारतंय ते बघा!
- यात कुठेही ते(मागचे) चुकलेत आणि यांनी मागच्या काळात खूप अन्याय सहन केला याची बोच नसते. किमानपक्षी यांनी तरी त्यांना समान मानावं अशी अपेक्षा करावं तर तेही नाही.
असा निष्कर्ष आपणच काढलेला असतो.
- प्रत्येकाचं असंच असतं
येथे आम्ही तर त्यांच्याशी 'असं' वागतो. (बघा आम्ही किती मोठ्या(?) मनाचे.) असं बोलल्या जातं.
कारण होणाऱ्या सुधारणांकडे 'सोयिस्कर' डोळेझाक करत हे लोक फक्त दुसऱ्याला नावेच ठेवत असतात अशा वेळी तोंड उचकटून बोलण्याशिवाय पर्यायच नसतो. आणि तसे केले तरीही ते तुम्हाला आवडत नाही. कारण यात तुमच्यावर उपकार केले गेले आहेत असे तुम्हाला वाटत राहते. तुमच्यात कोणत्याही प्रकारचा समजूतदारपणा नसतो.
- हो ! आम्हाला कुणाचेच उपकार नको आहेत. आम्ही जे मागतो ते आमच्या हक्काचं आहे. आणि ज्या सुधारणांचं तुम्ही गोडवं गाताय त्यांसाठी आम्ही खूप संघर्ष केलेला आहे. कुणी त्या 'दिल्यात" च्या भ्रमात राहू नये. आम्ही नावे ठेवतो, आरोप करतो, अन्याया विरुद्ध लढा देतो. माफ करा यासाठी कुणाचीही परवानगी घेत नाही.
म्हणजेच आजही समानता मनात नाहीच. दुर्दैव काय की आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊनही ही जात काही सुटत नाही.
जर अजूनही समानता नसती तर 'त्या' जातीचे लोक सर्वोच्च पातळीवर जाऊनच दिले गेले नसते. पूर्वी जशी गळचेपी होत होती तशीच आजही झाली असती. पण हे मुद्दामच विसरले जाते. आणि त्याबद्दल कोणी एक अक्षरही बोलत नाही.
- आक्षेप ! आक्षेप !! आक्षेप !!! या पुढचं मनातील उत्तर वाक्यासहित मनातच ठेवतो. तुम्हाला एक विनंती. इतिहास वाचा. पूर्वीची गळचेपी आम्ही मोडून काढली. आता कराल तर चोख उत्तर देऊ.
आपल्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापन करणारे श्री नरेंद्र जाधव यांनाही लोक 'त्या' जातीचा असं म्हणतात. असं खुद्द त्यांचा अनुभव आहे.
'त्या' जातीचा असे जेव्हा म्हटले जाते तेंव्हा खरे तर त्यांना आणि 'त्या' जातीतील समस्त लोकांना अभिमान वाटायला पाहिजे की आम्हीही तथाकथित उच्चवर्णीयांपेक्षा कमी नाही (अर्थातच पूर्वापार चालत आलेल्या वर्चस्वाला आव्हान दिल्याबद्दल). पण 'त्या' जातीतल्या किती लोकांना नरेंद्र जाधव माहीत आहेत याचा शोध घेतला तरी पुरे !
आज आमच्या पिढीला जात-पात, कर्म-कांड, भेदभाव नको असतानाही तुम्ही मात्र इतिहासातून बाहेर पडायचे नावच घेत नाही. आणि केवळ स्वतःच्या पूर्वग्रहांवर आधारीत समज करून घेतले जातात, लोकांना भडकविले जाते.
- ते त्या जातीचे आहेत याचा त्यांना आणि त्यांच्या समस्त जातीबांधवांना अभिमान वाटायला पाहिजे.( दिसतंय का जातीवरचं प्रेम!) त्यांच्यातल्या किती लोकांना डॉ. जाधव माहिती आहेत ते जाऊ द्या एक शोध घ्या की कित्येक लोकांना त्यांच्या बद्दल माहिती आहे आणि केवळ जात माहिती नाही.
हे खरं आहे की नव्या पिढीला कर्म-कांडात रस नाहीय. कारण त्यात आता उत्पन्न नाही. मात्र जातीचा उल्लेख नवी पिढी करीत नाही असं नाही. भेदभाव सामाजिक वर्तनात नसेलही कदाचित मात्र आजही आंबेडकरी जनतेला शक्य तोवर डावलण्याचेच प्रयत्न असतात. आम्ही इतिहास वाचतो, बोलतो ते सावध राहण्यासाठी, पुन्हा कुणी असा घात करायला नको ना !
यांच्या पूर्वजांनी कमावलेली सर्व जमीन आणि संपत्ती मात्र यांच्या कडेच ठेवा.
मला वाटते कूळ कायद्यामध्ये बऱ्याच लोकांना न्याय मिळाला आहे. आणि कूळ कायद्याचा गैरवापरही किती केला गेला आहे याची आपण माहिती काढलीत तर बरे होईल. ज्यावेळी आपण 'कमावलेली' जमीन/संपत्ती असा उल्लेख करता त्यावेळी ती संपत्ती ओरबाडून दुसऱ्या कोणाला दिली जावी अशी आपली इच्छा का ? अंबानींकडे कोट्यवधी संपत्ती आहे म्हणून ती त्यांच्याकडे राहताच कामा नये काय ?
अंबानींना माझा व्यक्तीगत विरोध मुळीच नाही. मात्र जर का त्यांच्या कृत्यामुळं कुणाचा रोजगार हिरावल्या जात असेल तर त्याच्या पोटाची आग , गोड बोलून शांत होणार नाही. अमेरिकेचं अंधानुकरण करणाऱ्या लोकांना आपली लोकसंख्या आणि त्याला अनुरूप असलेलं भारतीय मातीतील नियोजन नको असतं. असो हा विषय वेगळा. (विषयांतराचं मनोगतावरचं महापाप माझ्या माथी नको) कूळ कायद्याचं आणि विनोबांच्या भूदानाचं पुढे काय झालं याचं मी नव्याने वर्णन करायला नको. पश्चिम बंगाल वगळता भारतात कुठेही संपत्तीचं समान वितरण झालेलं नाही. हा अहवाल जागतिक बँकेचा आहे.
आजही भारतातील संपत्तीचे वितरण पाहता २० % (तथाकथित) उच्चवर्णीय जातींकडे ८०% संपत्तीचं एकत्रीकरण दिसेल. आजही निम्न वर्गीय जातींचा संघर्ष किमान जीवनमान दर्जा मिळवण्यासाठीच आहे. मात्र हे सोयिस्कर रित्या विसरलं जातं.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे ८०% संपत्ती जर उच्चवर्णीयांकडे असेल तर उरलेली २०% संपत्ती निम्नवर्णीयांकडे आहे असे समजू.
आता जी २०% टक्के संपत्ती निम्नवर्णीयांकडे आहे ती निम्नवर्णीयांकडे असलेली १००% टक्के संपत्ती आहे. तर एकूण १००% (२०%) संपत्ती १००%(८०%) टक्के निम्नवर्णीयांच्या किती टक्के लोकांकडे आहे. तुमच्या लक्षात येईल की त्या संपत्तीतील जास्तीत जास्त वाटा हा अगदी थोड्याच निम्नवर्णीयांकडे आहे. असे का झाले ? ती संपत्ती सर्वांमध्ये समान का वाटली गेली नाही ?
पुन्हा आपल्या उच्चवर्णीयांतही कित्येक लोक किमान जीवनमान दर्जा मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. थोडक्यात भारताच्या लोकसंख्येच्या २०% उच्चवर्णीय असतील तर त्यातील सगळेच उच्चवर्णीय संपत्ती बाळगून नाहीत. म्हणजे आपण जे काही विधान केलेत ते अर्धसत्य ठरत नाही का ? केवळ उच्चवर्णीयांतील किती टक्के लोक संपत्तीचा मोठा बाळगून आहेत हे स्पष्ट झाले तर बरे होईल.
अश्या अनेक मनोरंजनाची आम्हाला सवय झालेली आहे. (बेट्यांनो दिलेल्या २०% लढा , भांडा आणि जगा)
बरं पुन्हा आपण म्हणता त्याप्रमाणे जर उच्चवर्णीयांच्या पूर्वजांनी ती संपत्ती गोळा केली असेल तर यात तुम्ही आजच्या उच्चवर्णीयांना दोषी कसे काय धरू शकता ? असा प्रश्न विचारलेलाही तुम्हाला आवडत नाही.
नाही त्यांच्या वर्तनाला हे दोषी मुळीच नाही. मात्र आता ज्या नव्या समाजव्यवस्थेची पायाभरणी चाललेली आहे. त्याला या नव्यांनी 'त्या' मनोवृत्तीतून जर का विरोध केला तर मग यांच्याशी आमचा संघर्ष. अन्यथा नाही. या नव्या विचारसरणीच्या लोकांना एक आवाहन - कुठल्याही आंबेडकरी किंवा विद्रोही साहित्यात ब्राम्हण म्हणजे आमच्यावर अत्याचार करणारे लोक असा शब्द प्रयोग रूढ झालेला आहे. तुमची 'तशी' मनोवृत्ती नसेल तर खुशाल या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. आमचे लिहिणे बोलणे कुणाही साठी व्यक्तीगत नाही. आमचं भांडण मनोवृत्तीशी!
एकंदरीत मला असे वाटायला लागले आहे की तुमच्या पूर्वजांना 'जात' नकोशी वाटत होती पण आजच्या काळात मात्र तुम्हाला 'जात' हवीशी आहे कारण त्याचे भांडवल करणे सोपे असते. मुळात ज्या कारणासाठी हिंदू धर्माचा तुम्हाला राग आहे तो धर्म सोडून बुद्ध झाल्यावरही तुम्हाला आरक्षणे हवी आहेत. मग धर्म सोडण्याचा देखावा कशासाठी ? धर्म सोडल्यावरही तुम्ही हिंदू जातीचा फायदा का घेऊ इच्छिता ?? आता मला सांगा जात कोणाला सोडवत नाहीये ?
- बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करण्यापूर्वी पुरेसा वेळ हिंदू धर्माच्या प्रमुखांना दिला होता. १९३५ ला येवल्याला (नाशिक जिल्हा) बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर १९५६ ला धर्मांतर केले. एवढा वेळ पुरेसा नव्हता तुम्हाला कुठलीही सुधारणा करायला? सुधारणा म्हणजे त्यांना मानव म्हणून मान्यता हवी होती. गायी सारख्या जनावराला देव मानणारे लोक हाडामांसाच्या मानसांचा विटाळ मानत होती. त्यांनी त्यांना माणूस म्हणून मान्यता देणाऱ्या बुद्ध धम्माची वाट धरली.
बाबासाहेबांची विचारसरणी अत्यंत स्पष्ट होती.त्यांचा लढा स्पष्टपणे मनोवृत्तीशी होता. हिंदू धर्माबद्दल आकस असता तर त्यांना अनेक वाटा मोकळ्या होत्या. मात्र त्यांनी या जमीनीतील तत्त्वज्ञान जवळचे मानले. ज्यांनी १९५६ ला धम्माचा स्वीकार केला त्यांना विशेष तरतूद करून आरक्षण दिले गेलेले आहे. ते तुमच्या धर्मपीठातून दिल्या गेलेले नाही. त्यामुळे या आरक्षणाचा संबंध हिंदू धर्माशी आहे असा गैरसमज नसावा.
आज कुणीही बौद्ध बांधव स्वतःला जुन्या हिंदू जातीने संबोधताना दिसणार नाही. कुणाच्या मनात 'ती' जात असेल तर ती आहे या तथाकथित उच्चवर्णीयांच्या.
अधिक चर्चेचं स्वागत आहे.
नीलकांत