'खूप समोर' म्हणजे 'इथून दूर' ह्या अर्थाने वापरतात हे खरे आहे. मी आपली नागपुरी मराठी घेऊन दर उन्हाळ्यात सदाशिव पेठेत यायचो तेव्हा इथल्या गोवंड्यांना, भागवतांना आणि माझ्या मावसभावंडांना ती ऐकून मौज वाटायची. "चित्तरंजन पर्वतीला येऊन राहिलास काय? काय करून राहिलास, जेवून राहिलास की झोपून राहिलास" अशी माझी मस्करी करताना त्यांना गंमत वाटायची. पण त्यामुळे त्यानंतर माझे करून राहणे हळूहळू कमी झाले आणि मग बंदच झाले. पण ही लकब माझ्या बोलण्यातून जायला नको होती असे अजून वाटते. असो.
मी "गावस्कर 'बिकट' खेळतो" असे म्हटल्यावर गावसकरचे खेळणे दुस्तर आहे असे ह्याला सुचवायचे आहे असे सर्वांना वाटत असे. 'बिकट' म्हणजे मस्त, चांगला, सुंदर असे अर्थ त्यांना सांगितल्यावरही त्यांना ते वाक्य पटले नाही. एके दिवशी 'ती पुढची संध्या बिकट दिसते रे' असे मी बोलून गेलो आणि त्यांना अर्थ लगेच पटला.
-चित्तरंजन