प्रसाद महाशयांनी लिहिल्याप्रमाणे मुंबईपेक्षा बाहेर गिरण्या चालवणे फायद्याचे होते हे खरे. तरीही 'मुंबईच्या गिरणीतले कापड' हा दबदबा होता. पणन दृष्ट्या हा एक मोठा मुदा होता. शिवाय मुंबई आणि निर्यात या दोन्ही बाजारपेठांसाठी मुंबई हे स्थान वरचढ ठरते.
गिरण्यांचा कणा खरा मोडला तो संपामुळे, अन्यथा किमान १५-२० वर्षे या गिरण्या सहज चालू शकल्या असत्या, त्या सुधारल्या गेल्या असत्या, आधुनिकीकृत केल्या गेल्या असत्या. पण तरीही खरे गणित वेगळे होते. मुळात आता गिरणी मालकांची पिढी ही संस्थापक नसून संचालकांची म्हणजे वंशजांची होती. त्याना मुंबईचे वाढते महत्त्व स्पष्ट दिसत होते. वाडवडीलांनी जिच्याकडे संस्था म्हणून पाहिले तिच्याकडे ते मालमत्ता म्हणून पाहत होते. मुळात गिरण्या जुन्या असल्याने गुंतवणूक कधिचीच वसूल झाली होती. आता मिळत होता तो निव्वळ वरकड नफा.
७० ते ८० या द्शकात सर्व कामगार नेत्यांना झुगारून प्रभावि नेतृत्व म्हणून डॉ. दत्ता सामंत प्रचंड वेगाने व ताकदिने पुढे आले. अवजड व अभियांत्रिकी उद्योगात त्यांनी नुसते यशच मिळवले नाही तर दबदबा निर्माण केला. पुढे दबदब्याचे रुपांतर दहशतीत झाले. कामगार संघटनांवरून युद्ध पेटु लागले, कामगार विजरीत तलवार लपवून कामावर जाताना दिसू लागले. झटपट समृद्धि कुणाला नको असते? अर्थातच तमाम कामगारांना दत्ता सामंत या नावाचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले. य माणसाची कार्यपद्धति जरा वेगळी होती. "माझ्या कडे यायचे असेल तर सहा महिन्यांचे रेशन घरात भरून मगच या" ही भाषा ते बोलू लागले. त्यांच्या तत्कालिन यशाने झपाटलेले व त्यांच्या नेतृत्वाखाली झटपट व भरघोस पगारवाढ मिळवायची स्वप्ने पाहणारे कामगार त्यांच्या पूर्ण स्वाधिन झाले.
मुंबईतील गिरणी संप ही एक ऐतिहासिक घटना ठरली. त्याला प्रचंड प्रसिद्धी देण्यात आली. डॉ. उतरले म्हणजे आपण जिंकलो या स्वप्नाने भारलेले मराठमोळे कोकणी कामगार वेडे होउन त्यांच्यामागे उभे राहिले. मालकांना दमदाटी करणे, हिंसाचार, नासधूस वगरे दबावतंत्र वापरून डॉ. नी अनेक लहान/ मध्यम कारखान्यांत यश मिळवेल होते व नेमके हेच कामगारांना भुरळ घालीत होते. पगारवाढ व जोरदार बोनस या मागण्यांसाठी डॉ. च्या झेंड्याखाली एकवटलेले कामगार डोळ्यावर चढलेल्या धुंदीत काही गोष्टी पाहू शकले नाहीत. त्या अशा:
१) या माणसाला संघटित व महास्तरीय उद्योगात म्हणावे तसे यश कधिच मिळाले नव्हते. विशेषत: औषध उद्योगात डॉ. ना अजिबात यश आलेले नव्हते.
२) मुंबईतील जमिनींचे चढते भाव, जागा ही संपत्ति वापरून गिरणीच्या उत्पन्नाच्या अनेक पटिने अधिक पैसा मिळवायला उत्सुक असलेले मालक.
३) स्पर्धे पायी नफा घटून मालकावर्गाचे आकर्षण कमी होत चाललेला सूत गिरणी व्यवसाय व कमी भावात पुरवठा करायला बाहेर उभ्या होत असलेल्या गिरण्या.
४) अत्यंत संघटित व राजकिय दृष्ट्या मजबूत असलेले गिरणी मालक.
अशा परिस्थितीत सारासार विचार न करता केवळ आशेपोटी व लोभापोटी तसेच डॉ. च्या प्रचारतंत्राला बळी पडुन कामगारांनी संप पुकारला. जसजसा वेळ जात होता तसतसा मालकवर्ग बंद पडलेल्या गिरणीची गंजणारी यंत्रे पाहून आनंदित होत होता. खरेतर ही वेळ कुठेतरी सन्माननिय तडजोड करून नाश टाळण्याची होती, मात्र कामगार चक्रव्युहात शिरलेले होते व हळूहळू परतीचा रस्ता बंद होत होता. एकीकडे आशा, डॉ. ची भारावून टाकणारी भाषणे आणि दुसरीकडे संपाच्या विरुद्ध गेल्यास जीव गमावायची दहशत अशा अत्यंत दुर्दैवी व प्रतिकूल परिस्थितीत कामगार चिरडला गेला. एव्हाना मालकांना सबळ निमित्त मिळाले होते की यंत्र न चालवल्याने गंजली आहेत, निकामी झाली आहेत व जरी आता कामगार कामावर आले तरी ती गिरणी सुरू करणे आम्हाला शक्य नाही. उतरत्या नफ्यामुळे तसेच वाढत्या स्पर्धेमुळे नवी यंत्रे घेणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता हळुहळु कामगारांच्या व सामान्य माणसाच्याही लक्षात येउ लागले की हे सरळ सरळ सरकार, प्रचंड जमिनींची मालकी असलेले गिरणी मालक व दत्ता सामंत यांचे संगनमताचे कारस्थान आहे. नादारीच्या सबबीवर जमिन विकायला परवानगी मिळे पर्यंत मालकांनी १२-१८ रुपये प्रति चौरस फूट भावाने लाखो चौरस फूट जमिनीवरील गंजकी यंत्रे भंगारात काढु टाकुन त्या जागा गोदाम वा कचेरी साठी भाड्याने देण्यास सुरुवात केली. किमान विज खर्च, बोटावर मोजण्या इतके सुरक्षा कर्मचारी व सगळा पैसा आधिच्या पिढ्यांमध्येच वसूल करून दिलेल्या फुकटच्या जमिनींवर महिना लाखो-कोटी रुपये मिळ्ताच मालकांनी चंग बांधला की आता संप सुरू राहो वा कामगार शरण येवोत, गिरण्या चालवायच्या नाहीत. ९० ते ९५ या पांच वर्षाच्या काळात मुंबईच्या जमिनीच्या भावांत विक्रमी वाढ झाली, अनेक ठिकाणी एक-दिड वर्षात भाव दुपटीने वाढले, बांधकाम व्यवसायात संघटित व पदरी गुंड बाळगणारे व्यावसायिक शिरले. आणि गिरण्यांच्या मृत्युचा दाखला लिहिला गेला.
गिरण्यांच्या जागी दुकान संकुले, निवासी संकुले, क्रिडास्थाने, करमणुकीची साधने असे नाना उद्योग येउ लागले. इथे जुन्या कामगारांना रोजगार देता आला असता. पण मागच्या अनुभवाने शहाणे होउन मालकांनी त्यांना चार हात दूर ठेवले. भरीतभर म्हणजे आपल्या धिक्कराच्या देणाऱ्या कामगारांवर त्यांनी सूड उगवला, त्यांचे परस्पर संबंध संपामुळे कायमचे तुटले. याच काळात मालकांना 'कंत्राटी कामगार' या प्रकाराची चटक लागली आणि गिरणीतला कामगार चोहोकडून रस्त्यावर आला.