आजही कुणी विद्रोही अथवा कुणी आंबेडकरी जेव्हा हिंदू धर्मातील चुकांवर बोट ठेवतो आणि कुणाला उच्चवर्णीय म्हणून त्याच्या विषयी संताप व्यक्त करतो तेंव्हा काय होतं?

विद्रोही आणि आंबेडकरीच कशाला हिंदू धर्मातले लोकही धर्मातल्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवू शकतात. आंबेडकरांनी आणि इतर अनेक विचारवंतांनी हिंदू धर्मात असतानाच त्यातल्या चुका दाखवून दिल्या होत्या हे विसरता येणार नाही. चुका दाखवण्यामागचा हेतू प्रामाणिक असेल (म्हणजे नेत्यांप्रमाणे राजकीय/आर्थिक स्वार्थ नसेल) तर त्यावर मोकळ्या मनाने चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्या निष्कर्षांची अंमलबजावणी झाली पाहिजे असे मला वाटते.

मुळात हिंदू धर्म इतर धर्मांहून वेगळा आहे कारण या धर्माचा कोणी एक प्रवर्तक नाही कोणते एक पुस्तक प्रमाण नाही. कर्मकांडाचा पुरस्कार करणारे ग्रंथ आहेत तसेच कर्मकांड पूर्णपणे नाकारून फक्त तत्त्वज्ञान सांगणारे ग्रंथ आहेत. पण कोणतीही एक संहिता/पुस्तक/मार्गदर्शिका नसल्याने जो जसा अर्थ लावेल तसा अर्थ निघू शकतो. सुदैवाने महाराष्ट्रात संतपरंपरेमुळे हिंदू धर्माला सर्वांना सामावून घेणारा अर्थ मिळाला त्यामुळे इतर ठिकाणांपेक्षा (उ. प्र., बिहार इ.) तुलनेने महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे. (याचा अर्थ असा नाही की सगळे अगदी व्यवस्थित आहे.)

ज्या धर्माचे सर्वोच्च गुरुपद एका विशिष्ट जातीसाठीच गेली हजारो वर्षे राखून ठेवलेले आहे. त्या धर्माला आम्ही आमचा का मानावा? आमचे(?) धर्मगुरु (शंकराचार्य) कुणा मातंगाच्या हातचं अन्न खातील का?

हा अपप्रचार आहे असे वाटते. शंकराचार्यांना धर्मगुरू मानलेच पाहिजे अशी कोणतीही अट नाही. कोणाला गुरु मानायाचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील वारकरी कोणाला गुरू मानतात? नामदेव, तुकाराम, सावतामाळी, जनाबाई, स्वामी विवेकानंद कोणालाही गुरू मानता येईल किंवा कोणालाही गुरू न मानताही राहता येईल.

यांच्या पूर्वजांनी कमावलेली सर्व जमीन आणि संपत्ती मात्र यांच्या कडेच ठेवा. आजही भारतातील संपत्तीचे वितरण पाहता २० % (तथाकथित) उच्चवर्णीय जातींकडे ८०% संपत्तीचं एकत्रीकरण दिसेल.

बऱ्याच लोकांचा उच्चवर्णीय म्हणजे फक्त ब्राह्मण असा गैरसमज असतो, तो या विधानामुळे दूर होईल ही आशा आहे. महाराष्ट्राचे उदाहरण पाहू, महाराष्ट्रात जामिनी, पैसा, सत्ता, कारखाने, शिक्षणसंस्था कोणाकडे आहेत? जमीनजुमला, संपत्ती आणि सत्ता ब्राह्मण समाजाकडे अपवादानेच आली आहेत. असो.