विकीराव,

तुम्ही मांडलेले मुद्दे

१) स्वार्थि राजकारणाचा शिरकाव झाल्याने गिरण्या बंद पडल्या का(जाणुन बुजुन बंद पाडल्या?).

माझे मत - कोणत्याही क्षेत्रात, राजकारण हे असतेच. राजकारण हे कसे चालते त्यावर ते वाईट का चांगले ते ठरेल. त्यामुळे गिरणी क्षेत्रातसुद्धा राजकारण हे होतेच आणि आताही ते आहे. मी मागे नमुद केल्याप्रमाणे आर्थिक दृष्ट्या मुंबईतील गिरण्या चालवणे हे मालक वर्गाला कठीण जात होते, त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरची दादा मंडळी या क्षेत्रात येत होती. ती नवीन तंत्रज्ञान घेऊन येत होती त्यामुळे मुंबईतील सर्व गिरणीमालक हे खरे तर अडचणीतच सापडले होते. त्यावेळेला डॉ. दत्ता सामंतांसारख्या पुढाऱ्यांनी जर पुढील विचार करून गिरणी मालकांना, गिरण्या अत्याधुनिक करायला भाग पाडले असते तर, आज कदाचित परिस्थिती वेगळी असती, पण तसे न करता त्यांनी जो संपाचा आडमुठेपणा घेतला , ती बाब गिरणी मालकांच्या पथ्थावरच पडली. आणि त्यांनी मग त्या घोंगड्याला आणखी कुजेस्तवर भिजू दिले आणि गिरण्या बंद पाडायला मदत केली. त्यामुळे, 'या गिरण्या बंद पाडल्या गेल्या' हे विधान अर्धसत्यच ठरेल.

कारण , जरी तश्याप्रकारचा समजुतदारपणा दाखवून गिरण्या अत्याधुनिक केल्या गेल्या असत्या तरी, त्यातून बाहेर पडणारा कपडा महागच झाला असता, कारण, नवीन भांडवली गुंतवणूक आणि महाग कामगार.

याला थोडेसे साधर्म्य असलेले महिंद्रा कंपनीचे उदाहरण घेऊ. कामगारांनी संपूर्ण सहकार्य देऊनही, महिंद्राने नाशिकला कारखाना काढलाच. आणि त्यांची नवीन उत्पादने तेथूनच तयार होतात.  कारण मुंबईला  कामगार अतिशय महाग आहेत. (महिंद्राचे उदाहरण हे माझे स्वानुभावाचे मत आहे)
यासंदर्भात, श्री सर्वसाक्षी यांचे मत पडताळून पाहिले असता,  असे दिसेल कि गिरणी मालकांनी याचा त्यांना हवा तो फायदा उठवला आणि कामगारांना वाऱ्यावरती सोडले. जर संपूर्ण सहकार्याची भूमिका घेतली गेली असती तर दोघांनाही (कामगार आणि मालक) त्याचा योग्य तो फायदा झाला असता. (कदाचित).

पणन आणि कापडाची निर्याततर आताही होतच आहे आणि तीही जोमाने. शिवाय आता बाजारामध्ये स्थानिक नावाच्या / गावाच्या वस्तुंच्याऐवजी सर्वमान्य ब्रँडच्या (मराठी शब्द ?)  वस्तूंचीच खरेदी जास्त होते. त्यामुळे 'मुंबईचे कापड' या ब्रँडला तशी काहीही किंमत उरली नाही हे कुणीही मान्य करेल.

(२) त्या वेळचे कामगार नेते दत्ता सांमंत हे ही कारणिभुत आहेत का?

माझे मत - वरील (१) स्पष्टीकरणावरूनतरी दुर्दैवाने असेच म्हणावे लागेल, कि होय, डॉ. दत्ता सामंत हेही यास कारणीभूत आहेत. नेत्याने काळाची पाउले ओळखून त्याप्रमाणे लोकांना वळवायला हवे.

३) ऊत्तर मिळेल ना?

माझे मत - या प्रश्नाचे बहुधा ऊत्तर मिळाले असेल.

प्रसाद. 

अवांतर - अक्षरे न रंगवतासुद्धा या प्रश्नांतली दाहकता, तळमळ , चिकित्सा समजली असती !! (अर्थात हे माझे मत आहे)