कश्मिर बचाव आंदोलनाच्या आठवणी
इथली सगळी चर्चा बघून मला अ.भा.वि.प. च्या काश्मिर बचाव आंदोलनाची आठवण झाली.
सुमारे १४ वर्षांपूर्वी (१९९० मधे) झालेल्या काश्मिर बचाव आंदोलनामधे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी सहभागी होतो... (आणि काश्मिर करता एक रात्र तुरुंगातही राहिलो होतो!!)
मी तेंव्हा बारावीत होतो आणि पुण्याच्या स.प. महाविद्यालयात होतो. (शिकत होतो म्हणणं धाडसाचं आहे!). एक दिवस स.पच्या लेडी रमाबाई हॉलमधे एक सभा होती. बरीच गर्दी दिसली म्हणून मी आत गेलो. व्यासपीठावर काश्मिर मधून आलेल्या काही युवती होत्या. आणि त्या सध्या तिथे काय सुरु आहे हे (व स्वतःचे अनुभव) सांगत होत्या. त्यांचे अनुभव आणि एकुणातच ते बोलणं भीषण होतं... अंगावर काटा आणणारं होतं. त्यांचं बोलणं झाल्या झाल्या एका अ.भा.वि.प च्या कार्यकर्त्यानी असं सांगितलं की ते लवकरच 'काश्मिर बचाव आंदोलन' सुरु करत आहेत.
मी दुसर्याच दिवशी बादशाही समोरच्या मंगल भुवन मधे (अ.भा.वि.प चं पुण्यातलं प्रमुख कार्यालय) जाऊन त्या आंदोलनासाठी माझं नाव नोंदवलं. त्या आंदोलनाचं एकच साधं tangible उद्दिष्टं होतं... श्रीनगरच्या लाल चौकात जाउन तिथे तिरंगा फ्डकावणं आणि ध्वजवंदन करून परत येणं. (स्वतंत्र भारताच्या कुठल्याही कोपर्यात जाऊन तिरंगा फडकवण्यासाठी असं काही आंदोलन करावं लागतं हेच आपलं दुर्दैव...)
अर्थात माझं दिव्य घरापासून सुरू होतं! बारावीच्या वर्षात हे काय नस्ते धंदे सुचलेत तुला इथपासून सुरुवात झाली होती! पण तेंव्हा काश्मिरबद्दलच्या विचारांनी मी खूपच भारावून गेलो होतो, आणि काहितरी करून मी घरून संमती मिळवलीच.
या आंदोलनाच्या प्रचारासाठी मी इतर कार्यकर्त्यांबरोबर रात्र रात्र जागून पुण्याच्या कानाकोपर्यात पत्रकं चिटकवली. वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या वर्गा वर्गांमधे जाऊन भाषणं ठोकली. आणि ठरलेल्या दिवशी इतर शेकडो लोकांबरोबर झेलम एक्सप्रेसनी जम्मूला गेलो.
जम्मूला, देशभरातून सुमारे दहाहजार युवक जमले होते. सगळ्यांचं उद्दिष्ट एकच, श्रीनगरात जाऊन लाल चौकात तिरंगा फडकावणं. त्या दिवशी जम्मूमधे भयंकर उकाडा होता (४० ते ४५ डिग्री). आम्ही तशा उन्हा-उकाड्यात दिवसभर मोर्चे काढून हिंडत होतो. गल्लीगल्लीत सभा भरवत होतो, देशभक्तीपर गाणी गात होतो, पावलो पावली पाकिस्तानचे झेंडे जाळत होतो. एका नव-स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतल्यासारखं वाटत होतं. आणि ४२ - ४७ च्या चळवळीत आपण नव्हतो (जन्मलोही नव्हतो!) ही खंत दूर होत होती!! आमच्या या आंदोलनाला तत्कालीन अतिरेकी संघटनांनी जाहीर धमकी दिली होती, की श्रीनगर मधे येऊन दाखवा, गोळ्यांची बरसात करू...
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही सगळे श्रीनगरच्या दिशेनी निघालो. प्रचंड मोठा काफिला होता. सगळे उत्साहात होतो. पण जम्मूपासून थोड्या अंतरावरच उधमपूर नावाच्या गावात आम्हाला पोलीसांनी अडवलं.... आणि अटक केली. तिथून त्यांनी सगळ्यांना उचलून परत जम्मूला आणलं आणि बंदिवासात ठेवलं (देशासाठी तुरुंगवास भोगण्याचीही इच्छा पूर्ण झाली!!)
मग एक दोन दिवसांनी बंदिवासातून सुटुन आम्ही सगळे दिल्लीला आलो. तिथे तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या घरासमोर निदर्शनं केली आणि धरणं धरून बसलो. काहीवेळानी व्ही.पी सिंग तिथे येऊन आमच्या कडून तिरंगा घेऊन गेले. जाताना असं वचन देऊन गेले की ते स्वतः तो तिरंगा श्रीनगर मधे फडकावतील! त्या अश्वासनानी सुखावून जाउन आम्ही आपापल्या घरी परतलो.
त्यानंतरच्या चौदा वर्षात सिंग तर कधीच काळा आड गडप झाले. मधल्या काळात अ.भा.वि.प चे वडील (पक्षी: भाजप) हेही ४ - ६ वर्ष सत्तेवर येऊन गेले. चौदा वर्षांपूर्वी मी ऐकलेल्या सर्व कथा (काश्मिरमधल्या अत्याचारांपासून ते पाकिस्तानचा हस्तक्षेप, भाडोत्री अतिरेकी आणि ३७० वं कलम इ इ सर्व सर्व) मी आजही ऐकत आहे......
आणि या दरम्यानच्या काळात त्या तिरंग्याचं काय झालं याचा अजूनही पत्ता लागला नाहीये!
प्रसाद...
ता.क. मी बारावीची परीक्षा त्याच वर्षी दिली आणि ती खूपच चांगल्या गुणांनी उत्तिर्ण झालो, काळजी नसावी!