एक गोष्ट सांगाविशी वाटते. मोठी मजेदार आहे.
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सिंह आणि माणूस यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण यावरून भांडण चालू होते. चर्चेने प्रश्न काही सुटेना. तेव्हा दोघेही लढाईसाठी उतरले.
लढाई बरेच दिवस चालू राहिली. कधी सिंहाचे पारडे जड तर कधी माणसाचे. मात्र दोघेही तुल्यबळ असल्याने निकाल काही लागेना.
पण हळू हळू माणूस थकू लागला. लढाई चालू ठेवणे त्याला अवघड वाटू लागले. काय करावे हे कळेना. अचानक त्याला एक युक्ती सुचली.
दुसर्या दिवशी लढाईचा भोंगा झाल्यावर मैदानात उतरण्यापूर्वी माणूस सिंहाच्या तंबूमध्ये गेला. सिंहाला एक चित्र दाखवून तो म्हणाला, "ही लढाई व्यर्थ आहे. आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण याचा निर्णय आधीच झाला आहे. हा बघ पुरावा."
त्या चित्रामध्ये सिंह खाली पडलेला असून माणूस हातात तलवार घेऊन विजयी मुद्रेने त्याच्या अंगावर बसला आहे असे रेखाटले होते.
सिंहाने ते चित्र हिसकावून घेतले आणि दूरवर फेकून दिले आणि तो माणसाला म्हणाला, "हे चित्र माणसाने काढले आहे म्हणून त्यात सिंह खाली आहे, जर सिंहाने काढले असते तर माणूस खाली आणि सिंह विजयी दाखवला असता."