१. आजपर्यंत इतिहासात जे काही घडलं असं आपण मानत होतो त्यात एका गटाबद्दल जे काही चांगलं लिहिलं असेल ते सगळं आपण खोटं मानलं पाहिजे. तर आणि तरच आपल्याला जात न मानणारे म्हणता येईल. बर हे खोटं का मानलं पाहिजे म्हणजे हे खोटंच आहे याला पुरावा काय तर आम्ही म्हणतो म्हणून एवढंच उत्तर मिळतंय.

- आपल्या पूर्वजांचा अभिमान असणं ही बाब चांगलीच. मात्र त्यांच्या अभिमानापोटी त्यांनी केलेल्या चुकांचंही उदात्तीकरण करणे मात्र वाईट. आज तथाकथित उच्चवर्णीय जातीत जन्मलेल्या लोकांचा आणि इतर लोकांचा प्रत्यक्षात वैयक्तिक वाद काहीच नाही. बहुजन समाज आज जागा होतोय. तो आजवर मान खाली टाकून ऐकणार समाज आज मात्र प्रश्न करतोय. आपल्या पूर्वजांच्या चुका शोधतोय. आणि त्याची पुनरावृत्ती न होवो यासाठी समाज जागृती करतोय. या सर्वांत त्याचे प्रश्न मात्र उच्चवर्णीयांच्या पूर्वजांविषयी शंका निर्माण करताहेत.

या शंकांना समर्पक उत्तर न देता. आकसपूर्ण, उपहासात्मक आणि पूर्वग्रहदूषित उत्तरे दिली जातात. हे मात्र खरोखर चूक आहे. बरं नकोय उत्तर, त्यांच्या चुका, उत्तरे यांनी का द्यावी? तर नकोय उत्तर.

पण आजचे तुमचे वागणे तरी योग्य असू द्यात. आपल्याला सोईस्कर अश्या तुलना करायच्या. आपल्याला अनुरूप असेल तोच मुद्दा उचलायचा, जमेल तर मुद्द्यांसहित विरोध( याचे स्वागत आहे) न जमेल तर टिंगल, टवाळकी, उपहास किंवा भ्रम उत्पन्न करण्यात यांचा हातखंडा.

अशानं आपल्या समाजाचे तुकडे होत जातील. आता होतील हे आमचं मत मात्र यांच्या मते हा समाज आधीच चार तुकड्यात वाटल्या गेला होता. पण तेही सहन न झाल्याने, म्हणे यांच्या एका पूर्वजाने तेवीसवेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. म्हणून आता वर्ण दोनच. म्हणजे यांच्या मते या समाजाचे दोन तुकडे. हे असणं यांची परंपरा आम्ही मानावी का?

आमचं म्हणणं असं की आमचे पूर्वज वाईट नव्हते. त्यांना दिलेल्या या हीन वागणुकीचा आम्ही निषेध करतो, तर यांना त्यांच्या हीन नसण्याचा पुरावा आम्ही द्यावा असं अपेक्षीत आहे??? 

स्पष्ट प्रश्न विचारा , नक्की उत्तर देऊ !

आता मला प्रश्नांची उत्तरे द्या -

हिंदू धर्मातील विविध ग्रंथांत इतर जातींना हीन लेखणारे उल्लेख नाहीत का?

केवळ जन्मतः कुणी हीन वारसा घेऊन जन्मतो यावर तुमचा विश्वास आहे का?

माझ्या सगळ्या वंशाला शिव्या देणाऱ्या ग्रंथाला मी माझा धर्मग्रंथ कसा मानू?

या ग्रंथांचा आद्य कर्ता जरी कुणी वेगळा असला तरी आपल्या मनाने मानस चित्रण केलेला प्रकार आपल्या धर्मात नवा नाही. मग तरीही त्याच सर्व गोष्टी मी खऱ्या का मानाव्या?

येथे एका प्रतिसादात सविस्तर उत्तर देऊनही आणि होणारे गैरसमज टाळावेत या हेतूने वेळोवेळी स्पष्टीकरण देऊनही , माझं बोलणं व्यक्तीगत पातळीवर घेतल्या जातं. माझी भूमिका समजावण्याचा प्रयत्न दुर्लक्षून केवळ आपलं पूर्वग्रह भारीत मत ठोकल्या जातं याला काय म्हणावं?  

२. कुठल्याही तथाकथित उच्चवर्णीयाला स्वतःच्या परंपरांबद्दल आणि पूर्वजांबद्दल कुठल्याही प्रकारचा आदर असणे चुकीचे आहे.

आपल्या पूर्वजांचा योग्य बाबींसाठी अभिमान बाळगणे हे योग्यच. पण केवळ माझे पूर्वज म्हणून त्यांच्या अयोग्य कृतींचाही जबरदस्तीने चांगलाच अन्वय काढून आणि निघत नसेल तर न काढून सुद्धा अभिमान बाळगणे , थोडक्यात काय तर आपल्या पूर्वजांबाबत अकारण अहं ठेवणे वाईटच.

पहिल्या बाजीरावांचा आदर नक्कीच आहे, मात्र तो त्यांच्या कर्तृत्वाचा; वंशाचा नव्हे. तसेच दुसऱ्या बाजीरावाबद्दल केवळ तो 'या' वंशाचा म्हणून आदर बाळगायचा का?

३. सर्व तथाकथित उच्चवर्णीय हे श्रीमंतीत लोळणारेच असतात आणि जर काही जण दरिद्री दिसत असतील तर ते केवळ सोंग असते. (म्हणजे दिवसातून एकच वेळ भाकरी आणि लाल तिखट खाऊन डॉक्टरेट मिळवणाऱ्या माझ्या आजोबांची संपत्ती कुठेतरी असणारच पुरून ठेवलेली. एवढी संपत्ती असूनही स्वतःचं हक्काचं घर त्यांना घेता आलं नाही हे पण ढोंगच नाही का?)

एवढ्या सगळ्यात विद्रोही साहित्य म्हणजे नक्की काय हा प्रश्न मात्र उत्पन्न झाला कारण वरील गोष्टींचा पुरस्कार करणारे म्हणजेच विद्रोही साहित्य असेल तर मग.. देवंच भलं करो... (अरे माफ करा देव म्हणणे हे हिंदू झाले नाही का..)

- उगाच शब्दच्छल करु नका ! मी हिंदू आहे. आणि याचा मला अभिमान आहे. कुणी स्वतःला उच्चवर्णीय मानत असेल तर त्याला माझा विरोध आहे. आजचे एका विशिष्ट जातीत  जन्मलेले लोक अकारणच इतिहासातील समोल्लेखाने दुखावले जाऊ नये या उद्देशाने मी उच्चवर्णीय जरी कुणाला मानत नसलो तरी 'त्यांचा" उल्लेख मी तथाकथित उच्चवर्णीय असा केला. या जागी मी कुण्या एका किंवा काही जातींच्या गटाचा उल्लेख करू शकलो असतो. मात्र कुणी एका जातीत जन्मला म्हणून तो चांगला किंवा वाईट यावर माझा विश्वास नाही.

आजवर तुम्हाला शिव्या देण्याची किंवा ऐकण्याची सवय असेल. माझं मत असं आहे की येथे एक तर हिंदू धर्मात असलेल्या या असमानतेचा विरोध करा किंवा समर्थन करा. पण कुठेही कुणालाही अकारण शिव्या नको. मुद्दे द्या , मुद्दे !

नीलकांत